विसापूर येथे 1 हजार महिलांना प्रशिक्षण देणाऱ्या केंद्राचे उद्घाटन
चंद्रपूर: ऊसामुळे पश्चिम महाराष्ट्राचे भाग्य पालटले. अर्थाजन वाढले. घराघरांमध्ये सुबत्ता आली. हिच किमया पूर्व विदर्भात बांबू करू शकते. त्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून सिंगापूर पर्यंतच्या बाजाराचे वेध मला लागले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर येथे रेंजर कॉलेज परिसरात भाऊ (बांबू हॅन्डीक्राप्ट व आर्ट युनिट) नावाचे प्रशिक्षण केंद्र यापूर्वी बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने निर्माण केले होते. या केंद्रामधून शेकडो महिला बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण दिले जाते. आता विस्तारित व वेगळा कक्ष विसापूर येथे बीपीएड कॉलेज मार्गावर सुरू करण्यात आला आहे. या केंद्राचे लोकार्पण करताना श्री. मुनगंटीवार यांनी ही आशा व्यक्त केली.
लोकार्पण सोहळ्याला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डी.एस.के. रेड्डी, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ऋषिकेश रंजन, मुख्य वनसंरक्षक एस .टी .रामाराव, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी आदी उपस्थित होते.
श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, ज्या बांबू प्रशिक्षण केंद्रात तयार केलेल्या राख्या आपल्या हातावर बांधल्या, त्या भगिनींच्या रोजगाराची चिंता मला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात जसे ऊसामुळे शेतकरी प्रगत झाले. या संपूर्ण प्रदेशाचे अर्थशास्त्र बदलले. तसेच पूर्व विदर्भातील शेतीचे अर्थशास्त्र बांबू लागवडीतून बदलविण्याचा आपला प्रयत्न आहे. मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कामी येणाऱ्या बांबूला प्रचंड मागणी असून योग्य पद्धतीने मार्केटिंग झाल्यास महिलांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. आपण महिला शक्तीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून बांबू कला प्रशिक्षणातून जिल्हा रोजगाराभिमुख करण्याचा आपला संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातमी वाचण्यासाठी: बांबू क्षेत्राच्या सशक्तीकरणासाठी बांबू प्रवर्तन प्रतिष्ठानची स्थापना
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी रेंजर कॉलेजनंतर विसापूर येथे सुरू केलेल्या या नव्या कार्यशाळेची त्यांनी प्रथम पाहणी केली. या केंद्रातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विसापूरच्या परिसरातील जनतेची यावेळी त्यांनी विसापूरच्या जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिला असून विसापूरचा नावलौकिक वाढवा यासाठी आपण प्रयन्तरत आहोत. विसापूरजवळ लवकरच जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा व ऑलंपिकपटू तयार करणारे अद्ययावत क्रीडा संकुल आकाराला येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमामध्ये नव्या प्रशिक्षण कार्यशाळेत काम करणाऱ्या महिलांना बांबूपासून विविध वस्तू बनविणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन हेमंत शेंडे यांनी केले.
Published on: 18 September 2018, 06:56 IST