मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी शेतीच्या उपसा सिंचन योजनांवरील थकीत कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. श्रीकृष्ण उपसा जलसिंचन सहकारी सोसायटीचाही प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात येईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. मंत्रालयात धुळे जिल्ह्यातील शिंदखेड श्रीकृष्ण उपसा जलसिंचन सहकारी सोसायटीच्या कर्जमाफीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहकार आयुक्त सतीश सोनी, संबंधित सहकारी सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले की, शेतीसाठीच्या उपसा सिंचन योजनांचे कर्ज थकल्याने अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. शेतीच्या उपसा सिंचन योजनेवरील कर्जमाफी करण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेड श्रीकृष्ण उपसा जलसिंचन सहकारी सोसायटीचाही प्रस्ताव तयार करावा. यासाठी लागणार आर्थिक खर्च आणि शेतकऱ्यांची संख्या याचा अहवाल सादर करावा. दरम्यान राज्यातील आर्थिकदृष्ट्या आजारी असलेले साखर कारखाने भाडेतत्वावर, भागीदारी किंवा सहयोगी तत्वावर चालविण्यास देण्याबाबत आढावा बैठक संपन्न झाली. याबाबत निकष काय असावेत यावर चर्चा करून याबाबतचा लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे ऊस खरेदी कराचे बिनव्याजी कर्जात रूपांतर करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. बैठकीला साखर आयुक्त शेखर गायकवाड व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Published on: 04 September 2019, 08:16 IST