आपल्या जेवणाच्या ताटातून आता कांदा गायब होत आहे. जर तुम्ही कांदा खाण्याचे शौकिन असाल किंवा जेवणासोबत कांदा खाणं तुम्हाला आवडत असेल तर तुमची ही आवड महागडी होणार आहे. कारण आता परत कांद्याचे दर वाढू लागले आहेत. देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावात कांद्याला प्रति क्किंटल मागे ६०० रुपयांची वाढ झाली आहे. या दर वाढीमुळे ३ हजार ८०० रुपये प्रति क्किंटलला विकला जाणारा कांदा आता ४४०० रुपये क्किंटल झाला आहे.
लासलगाव बाजारपेठेत कांदा तीन वर्गवारीत विभागला जातो. यातील पहिला प्रकार हा उत्कृष्ट प्रतिचा कांदा, दुसरा प्रकार चांगला कांदा, आणि तिसरा म्हणजे खराब कांदा ,असे तीन प्रकार पडतात. पहिल्या प्रकारच्या कांद्याला ४४०० रुपये प्रति क्किंटल असा दर मिळतो. तर चांगल्या प्रतिच्या दुसऱ्या प्रकारच्या कांद्याला ३५०१ रुपयांचा दर आहे. तर खराब कांद्याला १००० रुपये प्रति क्किंटलचा भाव मिळत आहे. झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, कांद्याच्या दरातील वृद्धी ही पुढील तीन महिन्यांपर्यंत असेल. यामुळे सामान्य घरातील स्वंयपाक गृहातून कांदा गायब होणार आहे. यामुळे गृहिणींचा बजेट कोलमडणार आहे. पण यात मात्र बळीराजाच्या कष्टाला फळ मिळत असल्याचे दिसत आहे.
दर वाढीचे काय आहे कारण -
या कालावधीत लाल कांदा बाजारात येत असतो. आणि हा कांदा कर्नाटकातून अधिक प्रमाणात पिकत असतो. परंतु अति पाऊस झाल्यामुळे कांद्याचे पीक खराब झाले आहे. तर नवीन कांद्याचे पीक येण्यास अजून दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे.
Published on: 09 October 2020, 04:36 IST