Pune News : देशातून परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरु आहे. त्यासोबतच राज्यातून देखील मान्सून माघार घेतली आहे. हवामान देखील कोरडे झाल्याने तापमानाचा आलेख वाढता आहे. यामुळे ऑक्टोबर हिटचा चटका वाढला आहे. तापमानात चांगलीच वाढ झाल्याने नागरिक गरमीमुळे हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक शहरांचे तापमान ३५ अंश सेल्सियसच्या जवळपास गेले आहे.
राज्यातून मान्सूनची माघार झाल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. पण पुढील तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. पुणे शहराचे कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. मुंबईत तापमानाचा पारा ३४ अंशावर होते. विदर्भात अधिक तापमानाचा आलेख चढता आहे.
मुंबईत पुढील दोन दिवस ३५ अंशांपर्यंत तापमानाचा पारा राहण्याची शक्यता आहे. यामुळे पुढे देखील तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबईच नाही, तर देशातही ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान जाणवण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दरम्यान, अद्यापही देशातून पूर्णपणे मान्सून माघारी परतला नाही. तर केरळमध्ये देखील सध्या परतीच्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सध्या तामिळनाडूमध्ये चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे त्यांचा हवामानावर होणार आहे. यामुळे येते ३ दिवस मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांत ढगाळ वातावरण राहणार आहे.
Published on: 16 October 2023, 12:04 IST