मुंबई: राज्यात 10 नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी पुणे येथील 4, मुंबईचे 5 तर नवी मुंबई येथील 1 रुग्ण आहे. राज्यातील बाधित रुग्णांची संख्या 74 झाली आहे. एच एन रिलायन्स रुग्णालयात भरती झालेल्या करोना बाधित 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. हा राज्यातील दुसरा मृत्यू आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील भारती विद्यापीठ रुग्णालयात कोणताही परदेशी प्रवासाचा इतिहास नसलेली जी 41 वर्षीय महिला करोना बाधित आढळली तिचे चार जवळचे नातेवाईक करोना बाधित आढळून आले.
दरम्यान, राज्यातील शहरी भागात आज मध्यरात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू असून उद्या पहाटे पाच पर्यंत जनतासंचारबंदी वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी ‘मीच माझा रक्षक’ या संदेशाचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे केले. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, काल रात्री एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये एका 63 वर्षीय पुरुषाचा या आजाराने मृत्यू झाला. हा रुग्ण 19 मार्च 2020 रोजी रुग्णालयात भरती झाला होता. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय रोग हे आजारही होते. सुमारे 12 वर्षापूर्वी त्याची ॲन्जिओप्लास्टी झालेली होती.
या रुग्णाच्या परदेशी प्रवासाबाबत माहिती नाही तथापि 15 दिवसांपूर्वी तो गुजरातमधील सूरत येथे गेला होता, असे समजते. या रुग्णास भरती होण्यापूर्वी आठवड्यापासून ताप, थंडी वाजून येणे ही लक्षणे होती तर 17 मार्च पासून त्याला कोरडा खोकला आणि धाप लागणे हा त्रासही सुरु होता. भरती झाल्यावर त्याला श्वसनास तीव्र त्रास असल्याने व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या तपासणीत सदर रुग्ण हा करोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णास लक्षणानुसार उपचार तसेच व्हेंटीलेटर सपोर्ट देण्यात आला होता तथापि रुग्णाने उपचार प्रतिसाद न दिल्याने काल दिनांक 21 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाची पत्नीही आज करोना बाधित आढळली आहे. ती देखील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात भरती आहे.
याशिवाय कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेले 5 रुग्ण करोना बाधित आढळले आहेत. यातील 2 रुग्णांनी अमेरिकेचा तर प्रत्येकी एकाने स्कॉटलंड, तुर्कस्तान आणि सौदी अरेबिया येथे प्रवास केलेला आहे. या 5 रुग्णांपैकी 1 रुग्ण ऐरोली, नवी मुंबई येथील आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील:
- पिंपरी चिंचवड मनपा- 12
- पुणे मनपा- 15 (दि. 22 मार्चला 4 रुग्ण आढळले)
- मुंबई- 24 (दि. 22 मार्चला 5 रुग्ण आढळले)
- नागपूर- 04
- यवतमाळ- 04
- कल्याण- 04
- नवी मुंबई- 04 (दि. 22 मार्चला 1 रुग्ण आढळला)
- अहमदनगर- 02
- पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी प्रत्येकी 1
- एकूण- 74 (मुंबईत दोन मृत्यू)
राज्यात आज परदेशातून आलेले एकूण 284 प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात सध्या 7,452 लोक घरगुती विलगीकरणात (होम क्वारंटाईन) आहेत. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 1,876 जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 1,592 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 74 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार अतिजोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक पातळीवर क्वारंटाईन करण्यात येत असून आज पर्यंत 791 जणांना विविध क्वारंटाईन संस्थांमध्ये ठेवण्यात आले असून आजपर्यंत त्यापैकी 273 जणांना घरगुती क्वारंटाईन करता सोडण्यात आले आहे तर सध्या 518 प्रवासी क्वारंटाईन संस्थामध्ये आहेत.
Published on: 23 March 2020, 08:26 IST