मनुष्यप्राणी नैसर्गिक संपत्ती नष्ट करू लागल्याने त्याचे वाईट परिणाम सध्या सर्वांनाच भोगावे लागत आहेत. जंगले संपत चालल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीत घुसून आपले अन्न मिळवू लागले आहेत. त्याचा मोठा फटका मात्र ग्रामीण भागातील शेतकरी आणि गोरगरिबांना बसत आहे. त्याचाच प्रत्यय कोल्हापूर जिल्हयातील भुदरगड तालुक्यात आला असून गिरगाव धनगरवाडा परिसरात बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात ५ शेळ्या मृत झाल्या असून या मेंढपाळ कुटुंबाच्या प्रमुख आधारावरच आघात झाला आहे.
हा हल्ला मादी बिबट्याकडून केला गेल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या अनपेक्षित हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळून गोरगरीब जनतेचे आर्थिक नुकसान करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अशा हल्ल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
भुदरगड तालुक्यातील गिरगाव धनगरवाडा येथील सोनाबाई बाबुराव फोंडे ह्या मेंढपाळ असून हा व्यवसाय त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. त्या नेहमीच्या शेत परिसरात शेळ्या चारावयास गेल्या होत्या. यावेळी अचानक झाडामध्ये लपून बसलेल्या बिबट्याच्या नर मादीने सोनाबाई फोंडे यांच्या शेळ्यांवर हल्ला केला. फोंडे यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्यांपैकी २ शेळ्या घेऊन जंगलाच्या दिशेने पलायन केले.
मागील महिन्यातच सुद्धा या परिसरात बिबट्याने गायीला ठार केले होते. तर आता शेळ्यांवर झालेल्या हल्ल्याने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच वनपाल मारुती डवरी, वनरक्षक वेणू बोंडे, वनसेवक महादेव करडे, रवी मांडे, दिनकर साठे, पोलीस पाटील रेश्मा कातकर यांनी घटनेचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एम. मेटांगळे यांनी मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले.
Published on: 13 March 2022, 11:27 IST