परभणी: विद्यापीठ विकसित कृषी तंत्रज्ञानाचे मुल्यमापन करणे व हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची महत्त्वाची भुमिका कृषि विज्ञान केंद्रावर असुन शेतकऱ्यांमध्ये कृषि तंत्रज्ञानाबाबत विश्वासार्हता वाढीसाठी कृषि विज्ञान केंद्रानी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या मराठवाड्यातील बारा कृषि विज्ञान केंद्राची वार्षिक कृती आढावा कार्यशाळेचे आयोजन विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने दिनांक 5 व 6 मार्च रोजी करण्यात आले असुन कार्यशाळेच्या उदघाटना प्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, विद्यापीठ नियंत्रक श्री. एन. एस. राठोड, मुख्य विस्तार शिक्षणाधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. अशोक ढवण पुढे म्हणाले की, दर्जेदार फळपिकांच्या रोपांची व बियाण्याची शेतकऱ्यांमध्ये मोठी मागणी असुन प्रत्येक कृषि विज्ञान केंद्रानी आपआपल्या प्रक्षेत्रावर फळपिकांची रोपवाटीका विकसित करावी. यात आंबा, मोसंबी, डाळिंब आदी फळपिकांच्या रोप निर्मितीवर भर द्यावा. तसेच जैविक खते, जैविक कीडनाशके, गांडुळ खत आदी निविष्ठांची निर्मिती करून विक्री करावी. केंद्राच्या प्रक्षेत्रावर विद्यापीठ विकसित विविध पिकांचे वाण व तंत्रज्ञान प्रात्यक्षिके आदर्श पध्दतीने राबवुन शेतकऱ्यांमधील कृषि तंत्रज्ञान अवलंब वाढीसाठी कार्य करावे, असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. देवराव देवसरकर यांनी कृषि विज्ञान केंद्रानी बदलत्या हवामानास अनुकूल तंत्रज्ञान, आंतरपिक पध्दती, विद्यापीठ विकसित जैवसमृद्ध बाजरी व ज्वारीची वाण आदी प्रसारावर भर द्यावा असे सांगितले. सुत्रसंचालन डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले तर आभार डॉ. किशोर झाडे यांनी मानले. दोन दिवसीय कार्यशाळेत विद्यापीठातील विभाग प्रमुख, विद्यापीठ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार असुन कृषि विज्ञान केंद्राचा वार्षिक कृती आढावा घेऊन पुढील वर्षाचा कृती कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. कार्यशाळेत मराठवाडयातील बारा कृषि विज्ञान केंद्रातील कार्यक्रम समन्वयक व विषय विशेषज्ञ, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत.
Published on: 10 March 2020, 08:26 IST