आंबा हे सर्वांचेच आवडते फळ असते. आंब्याच्या अनेक जाती आहेत. मात्र हापूस आंबा अधिकच चवदार असल्यामुळे त्याला मागणी मोठी असते. आता डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे. पुणे बाजार समितीमधील गुलटेकडी येथे देवगड हापूसची पहिली पेटी आली आहे. आंब्याची पहिली पेटी घेण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी करत बोली लावली. त्यामुळे हापूसच्या पहिल्या पेटीला चांगला भाव मिळाला आहे.
आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांच्या गाळ्यावर हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीचा लिलाव झाला. त्यांच्याकडे देवगड हापूस आंब्याच्या पाच पेट्या आल्या होत्या. हापूस आंब्याची पहिली पेटी घेण्यासाठी ग्राहकांमध्ये चांगलीच चढाओढ लागल्याचे पाहाला मिळाले. या पाच पेट्यांपैकी पाच डझनच्या एका पेटीला तब्बल २१ हजार रुपये दर मिळाला. त्यानंतर इतर पेट्यांना १५ हजार आणि ११ हजार दर मिळाला आहे.
कोथरुड येथील रहिवाशी जोतिराम बिराजदार आणि जगन्नाथ वंजारी यांनी या आंब्याची खरेदी केली. देवगड येथील रज्जाद काची यांच्या बागेतील हा आंबा होता. हंगामपूर्व उत्पादनातील आंब्याची ही पहिली आवक होती. देवगड हापूसचा हंगाम टप्पाटप्याने सुरु होऊन फेब्रुवारीपासून नियमित हंगाम सुरु होणार आहे. हापुस आंब्याच्या पहिल्या पेटीला बाजारात चांगला भाव मिळाल्याने, आंबा उत्पादकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.
Published on: 02 December 2023, 10:56 IST