सध्या राज्यात साखर कारखाने सुरु आहेत. या गळीत हंगामात अनेक अडचणी आल्या, असे असताना आता अतिरिक्त उसाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आणि कारखान्यांसमोर पडला आहे. यामुळे आपला ऊस जाणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. संपूर्ण राज्यात हा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्यात यंदा अधिकचे गाळप होऊनही ऊसतोडीचा मुद्दा समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर अखेर प्रादेशिक सहसंचालक यांनी बीड जिल्ह्यात साखर कारखानदार तसेच लोकप्रतिनीधी यांच्याशी बैठक घेऊन काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा केली आहे. यामध्ये काही निर्णय घेण्यात आले आहेत.
यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस फडात आहे तोपर्यंत साखर कारखाने हे सुरुच राहणार असल्याचे सहसंचालक शरद जरे यांनी सांगितले आहे. या धोरणात्मक निर्णयामुळे अखेर अतिरीक्त ऊसाचा प्रश्न निकाली निघेल मात्र, झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यामुळे येणाऱ्या काळातच याबाबत सगळ्या गोष्टी समजणार आहेत. लागवडीपासून ठराविक म्हणजे १२ महिन्यांमध्ये उसाला तोड आली तर त्याचे वजन आणि उतारा चांगला बसतो, तसेच रान मोकळे झाल्याने दुसरे कमी दिवसाचे पीक देखील घेता येते. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो. यासाठी ही महत्वपूर्ण बैठक झाली.
मराठवाड्यात यावर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आहे. कारखान्यांकडील गाळप क्षमता, कारखान्याकडे झालेल्या नोंदी याबाबत संहसंचालक यांनी बैठक घेतली. मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस फडामध्ये राहणार नाही तर त्याचे गाळप होणारच आहे. हे गाळप पूर्ण झाल्याशिवाय साखर कारखाने हे बंद होणार नसल्याचे सहसंचालक शरद जरे यांनी सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जरी दिलासा मिळाला असला तरी कारखाना बंद झाल्यावरच याबाबत माहिती मिळेल.
नोंदणी झालेल्या ऊसाचे गाळप लवकरात लवकर करून घ्यावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. यामध्ये अनेकदा वशिलेबाजी करून मोठ्या प्रमाणावर ऊसतोड केली जात असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकरी नाराज आहे. बीड जिल्ह्यातील आंबाजोगाई येथे ही बैठक पार पडली. पश्चिम महाराष्ट्रात देखील असाच प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यामुळे आपला ऊस लवकरात लवकर घालवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे.
Published on: 19 January 2022, 06:13 IST