अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करत असतात. यामुळे इतर शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होत असतो. तसेच राज्यात देखील अनेक ठिकाणी कृषी प्रदर्शन आयोजित केली जातात. यामध्ये देखील अनेक प्रयोग केले जातात. असे असताना आता पुण्यातील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या घराच्या टेरेसवर द्राक्षची बाग फुलवली आहे. यामुळे या शेतकऱ्याचे कौतुक केले जात आहे. अगदी शेतात ज्याप्रमाणे शेती केली जाते, तशाच प्रमाणे या शेतकऱ्याने ही बाग फुलवली असून आता त्याला द्राक्ष देखील आली आहे.
येथील उरळी कांचन मधील 58 वर्षीय भाऊसाहेब कांचन त्यांचा पारंपरिक शेती व्यवसाय आहे. त्यांची सव्वा तीन एकर शेती आहे. त्यांनी दोन एकरात ऊस, तर दहा गुंठ्यात नारळ, सुपारी, आवळा, जांभूळ, पेरू, आंबा, डाळिंब, चिकू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची त्यांनी लागवड केली. कांचन यांनी साधारण सहा वर्षांपूर्वी घराच्या बाजूला द्राक्षाच्या दोन रोपांची लागवड केली होती. त्यानंतर त्यांनी टेरेसवरच द्राक्षाची बाग फुलवली. यामध्ये ते यशस्वी देखील झाले आहेत. यामुळे याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
याबाबत माहिती अशी की भाऊसाहेब कांचन 2013 मध्ये शेतकरी सहलीच्या निमित्ताने युरोप दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी युरोपात फुललेली द्राक्ष शेती पाहिली. अनेक घरासमोर घराच्या टेरेसवर द्राक्षाच्या बागा लावलेल्या पाहिल्या. हे सर्व युरोपात होऊ शकते तर कृषिप्रधान देश म्हणून ओळख असणार्या भारतात हे का होऊ शकत नाही? असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी तेथे अनेक नवनवीन प्रयोग बघितले. आणि अशाच प्रकारे आपल्या देशात आपण शेती करायची असे त्यांनी आपल्या मनाशी पक्के केले.
आपल्या देशात येताच त्यांनी याबाबत विचार सुरु केला. याबाबत ते म्हणाले की, जेव्हा त्यांनी २०१५ मध्ये घराचे काम सुरु केले होते, तेव्हा मांजरी येथून याचे रोप आणले आणि घराच्या बाजूला लावले. जसेजसे दिवस गेले तसेतसे हे रोप वाढतच गेले. आणि २०१९ मध्ये वेलीला द्राक्ष येऊ लागले. आतापर्यंत त्यांना केवळ सहा हजार रुपये खर्च झाला आहे. त्यांचा हा अभिनव प्रयोग बघण्यासाठी अनेकजण सध्या त्यांच्या घरी भेट देत आहेत. तसेच ते कोणाच्या घरी गेले तर ते ही द्राक्ष भेट म्हणून देतात. त्यांना त्यांच्या कुटूंबाने यासाठी मोठी मदत केली असल्याचे ते आवर्जून सर्वांना सांगतात.
Published on: 15 January 2022, 02:12 IST