Sangli News : सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेला रोहित पाटील यांची तबेत खालावली आहे. रोहित पाटील यांची तबेत खालावली असल्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. तसंच त्यांच्या तबेतीची देखभाल करण्यासाठी उपोषण स्थळी डॉक्टरांचे पथक देखील दाखल झाले आहे. टेंभू योजनेत तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यातील १७ गावांचा समावेश करा, या मागणीसाठी रोहित पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांनी उपोषण सुरु केलं आहे.
रोहित पाटील यांची काल (दि.२) तबेत बिघडली. काल त्यांना ताप आला होता. तेव्हापासून डॉक्टरांचं पथक तेथे दाखल झाले आहे. रोहित पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांची बहीण स्मिता पाटील या सुद्धा घटनास्थळी बसून आहेत. पाणी प्रश्नासाठी रोहित पाटील, आमदार सुमनताई पाटील यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु आहे.
रोहीत पवार, जयंत पाटील यांच्याकडून उपोषणाला पाठिंबा
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आंदोलनस्थळी जावून आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आज (दि.३) राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार देखील उपोषण स्थळी जाऊन याला पाठिंबा देणार आहेत.
सरकारकडून एक मागणी पूर्ण
आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी राज्य सरकारने एक मागणी पूर्ण केली आहे. टेंभू विस्तारित योजनेसाठी ८ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यायला महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. सुमनताई पाटील यांच्या प्रमुख मागण्यांपैकी पहिली मागणी उपोषण सुरू होण्याआधीच मान्य झाली.
Published on: 03 October 2023, 11:07 IST