नंदुरबार : देशातील 70 टक्के लोकांचा व्यवसाय शेतीवर आधारित आहे. शेती हा अत्यंत गुंतागुतीचा विषय असून शाश्वत शेतीशिवाय शेतकरी त्यात रमत नाही. शेती व्यवसायातून स्थलांतरित होण्याची मानसिकता मोठ्या प्रमाणात असताना कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न नक्कीच शाश्वत शेतीतून या भागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. अशा या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असे यावेळी राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्रद्वारे सिलेज आधारित परिसर विकास कार्यक्रम (CADP) अंतर्गत उभारण्यात आलेल्या कृषक ज्ञान विज्ञान मंडपम् आणि महिलांसाठी तंत्रज्ञान पार्क या वास्तूंच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी आमदार सर्वश्री आमशा पाडवी, राजेश पाडवी, कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ जळगावचे कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, एमसीआरसीएम मुंबईचे कार्यकारी अधिकारी निलेश सागर, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. कार्यकारीणी सदस्य मा.वी. भागय्याजी, भा.कृ.अ.नु.प.अटारी पुण्याचे संचालक डॉ. एस.के. रॉय, योजक (पुणे) चे अध्यक्ष डॉ. गजानन डांगे, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे सदस्य सचिव डॉ. एन.जी. शहा, डॉ. हेडगेवार सेवा समिती अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले, सचिव डॉ, नितीन पंचभाई, कृषि विज्ञान केद्र प्रमुख राजेंद्र दहातोंडे, कोळदाचे सरपंच मोहिनी वळवी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी शेतकरी मेळावा, बचत गटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुण्यातील योजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
Published on: 08 April 2025, 10:54 IST