नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला राजकीय स्वरूप मिळालं आहे. आंदोलनाच्या नावाखाली तमाशा सुरू आहे, अशी टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे. पाशा पटेल यांनी यावेळी शरद पवार कृषी कायद्यांवरील चर्चेदरम्यान शरद पवार राज्यसभेत उपस्थित का नव्हते? अशी विचारणादेखील केली आहे. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
“दोन महिन्यांहून अधिक काळ राजधानीत आंदोलन सुरू आहे. केंद्र शासनाने सुरुवातीपासून शेतकऱ्यांशी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या चारपैकी तीन मागण्या मान्य करूनही विरोध सुरू असून तो नेमका कशासाठी आहे याचे गमक कळलं नाही. शेतकरी नेत्यांना आंदोलनाच्या नावावरून तमाशा करण्यात रस आहे,” अशी टीका पाशा पटेल यांनी केली आहे.पाशा पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीकेची तोफ डागली. “शरद पवार राज्यसभेचे सदस्य आहेत. राज्यसभेमध्ये शेतकरी कायद्यांवर चर्चा सुरू होती त्यावेळी शरद पवार राज्यसभेत उपस्थित का नव्हते?,” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची मोठी गंमत आहे. शेतकऱ्यांना सरकारचे मत ऐकायचे नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे पालथ्या घागरीवर पाणी, असा प्रकार सुरू आहे. सरकार सर्व मागण्यांवर चर्चा करायला तयार असताना शेतकऱ्यांनी आडमुठे धोरण ठेवले आहे. त्यांना प्रश्न सोडवून घ्यायचे नाहीत, त्यांना तमाशा करण्यात रस आहे, असा टोला पाशा पटेल यांनी लगावला.
सदाभाऊ खोत फुटले नसते तर ते भाजपसोबत असते. तुमचा माणूस फुटला म्हणून भाजप बेईमान कसा ? अशी विचारणाही पटेल यांनी केली. राजू शेट्टी म्हणजे सेना गेलेले पती असा टोलाही त्यांनी लगाविला.
Published on: 10 February 2021, 06:41 IST