परभणी: शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य मुल्य मिळण्याकरिता ई नाम प्रणाली कार्यक्षमरित्या राबविणे गरजेचे असुन ई नाम योजनेबाबत शेतकरी, कृषी उद्योजक, आडते, कंपन्या यांच्यात जागृतीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हैद्राबाद येथील राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेचे (मॅनेज) संचालक डॉ. के. सी. गुम्मागोलमठ यांनी केले.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्त्र विभाग व महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 व 22 डिसेंबर रोजी महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संस्थेच्या बावीसाव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात होते या परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात (दिनांक 22 डिसेंबर रोजी) ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश महिंद्रे हे होते तर व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, विभाग प्रमुख डॉ. किशोर देशमुख, डॉ. डि. बी. यादव, डॉ. बी. एन. गणवीर, डॉ. एस. एस. वाडकर, डॉ. आर. जी. देशमुख, डॉ. के. पी. वासनिक, मुख्य आयोजक डॉ .दिगंबर पेरके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. के. सी. गुम्मागोलमठ पुढे म्हणाले की, एका बाजुस शेतमाल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी किंमत द्यावी लागते, परंतु त्यातील मुख्य नफा शेतकऱ्यांच्या पदरात न पडता, व्यापाऱ्यांनाच होतो. ई नाम विपणन व्यवस्थेत स्पर्धेात्मकरित्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल. करार पध्दतीने शेतीची संकल्पना पुढे येत आहे, परंतु यात शेतकऱ्यांचे शोषण होणार नाही यासाठी असलेल्या मॉडेल कॉन्ट्रट फार्मिंग एक्टची योग्य अंमलबजावणी करून शेतकरी व कंपन्यात एक विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल. शेतमाल विपणनमध्ये कृषी पदवीधरांना कार्य करण्याची मोठी संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.
संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर आपल्या भाषणात म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतमाल विपणन यंत्रणा मजबुत करावी लागेल. सफरचंद व नारळ ही पिके काही भागातच पिकतात, परंतु ही दोन्ही फळे संपुर्ण देशात उपलब्ध होतात, त्याचा योग्य मोबदला उत्पादकांना मिळतो, यासारख्या बाबींचा अभ्यास कृषी अर्थशास्त्रातील संशोधकांनी करावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. किशोर देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. रणजित चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. सचिन मोरे यांनी मानले. सदरील परिषदेत देशातील व राज्यातील शंभर पेक्षा जास्त कृषी शास्त्रज्ञ सहभागी झाले होते तांत्रिक सत्रात सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, कृषी विकासाचे सामाजिक-आर्थिक मानके, सुधारित कृषी तंत्रज्ञानाचा परिणाम, कृषी विपणन धोरण, शेतमाल मुल्य धोरण आदी विषयांवर सहभागी शास्त्रज्ञ संशोधन लेखांचे व पोस्टरचे सादरीकरण केले. यातील उत्कृष्ट संशोधन लेख व पोस्टर सादरिकरण करणाऱ्या संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्माननित करण्यात आले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी, विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.
Published on: 23 December 2019, 03:39 IST