नवी दिल्ली: दिनांक १३ मार्च २०२० पर्यंत देशातील नवे साखर उत्पादन २१० लाख टन झाले असून ते गतवर्षीच्या या तारखेच्या साखर उत्पादनापेक्षा ५७ लाख टनाने कमी आहे असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
यामध्ये उत्तरप्रदेश राज्याने ८३ लाख टन साखरेचे उत्पादन करून पुन्हा एकदा आघाडी घेतली असून हे उत्पादन गेल्या वर्षीच्या राज्यातील या तारखेच्या उत्पादनापेक्षा २ लाख टनाने अधीक आहे. या उलट महाराष्ट्रातील ५५ लाख टन नवे साखर उत्पादन हे गतवर्षीच्या या तारखेस झालेल्या साखर उत्पादनापेक्षा ४३ लाख टनाने कमी आहे. कर्नाटक मधील ३३ लाख टन नवे साखर उत्पादन हे देखील गतवर्षी या तारखेस झालेल्या साखर उत्पादनापेक्षा ९ लाख टनाने कमी आहे.
गुजरातमध्ये ८ लाख टन नवे साखर उत्पादन झाले असून ते गतवर्षीच्या या तारखेस झालेल्या साखर उत्पादनापेक्षा अडीच लाख टनाने कमी आहे. अशीच थोडी फार परिस्थिती इतर राज्यात दिसत असून हंगाम अखेर देश पातळीवरील नवे साखर उत्पादन २६५ लाख टनाइतके सीमित राहण्याचे अनुमान असून त्यात उत्तर प्रदेश ११८ लाख टन, महाराष्ट्र ६० लाख टन, कर्नाटक ३४ लाख टन आणि गुजरात ९ लाख टन असण्याचा अंदाज आहे.
"हंगाम सुरुवातीची देश पातळीवरील शिल्लक जरी विक्रमी १४५ लाख टन इतकी असली तरी त्यातून राखीव साठा योजनेमधील ४० लाख टन व अपेक्षित निर्यात ५० लाख टनाची लक्षात घेता हंगाम अखेर सुमारे ५५ ते ६० लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज असून त्याचा अनुकूल परिणाम स्थानिक बाजारातील साखर विक्री दरावर राहील. मात्र कुठल्याही परिस्थितीत किमान ५० लाख टन साखर देशाबाहेर जाण्यावरच वरील आशादायक आकडेवारी दिसणार आहे. तेव्हा जरी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय साखर दरात सध्या घसरण झालेली असली तरी उद्दिष्टाप्रमाणे साखर निर्यात होण्यावरच नजीकच्या भविष्यातील स्थानिक साखर दर टिकून राहण्यास मदत होणार आहे" असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले.
Published on: 14 March 2020, 03:51 IST