मागील आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. आता अवकाळी पावसाचा प्रभाव कमी झाला असून राज्यात आजपासून कोरडे हवामान राहणार आहे. कोरडे हवामान असल्यामुळे राज्यातून गायब झालेली थंडी पुन्हा काही प्रमाणात वाढण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.
दरम्यान देशातील अनेक राज्यात थंडीचा प्रकोप पाहण्यास मिळत आहे. काश्मीरच्या अनेक भागात परत हिम वृष्टी होणार आहे. देशातील इतर भागात विशेषत: दक्षिण भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.अरबी सुमुद्राच्या नैऋत्य भागात काही प्रमाणात चक्रीय वाऱ्यांची स्थिती असली तरी त्याचा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे राज्यात सहा ते ७ दिवस असलेली ढगाळ वातावरणाची स्थिती निवळून गेली आहे.मात्र अरबी समुद्राच्या नैऋत्य भाग ते मध्य प्रदेशचा वायव्य भाग यादरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. तो पट्टा अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि दक्षिण गुजरात परिसर ते उत्तर महाराष्ट्र या दरम्यान आहे. त्यामुळे या भागात काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे.
त्यामुळे मागील काही दिवसांपासून या भागात किमान तापमानात चांगलीच वाढ होऊन थंडी गायब झाल्याचे चित्र होते. मात्र, आता ही स्थिती कमी होत असल्याने पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात वेगाने बदल होत आहेत. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात निचांकी २५.० अंश सेल्सिअसची किमान तापमान नोंद झाली. कोकणात किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. कोकणात काही अंशी असलेल्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान १८ ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.
मध्य महाराष्ट्रातही पाऊस झाल्याने हवेत गारठा वाढल्याने किमान तापमानात चढ-उतार असल्याचे आढळून आले. या भागात १६ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. मराठवाड्यात व विदर्भात हवामान कोरडे असल्याने किमान तापमान किंचित घट झाली आहे.या भागात १५ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
Published on: 11 January 2021, 10:46 IST