News

दिवाळी हा कौटुंबिक कार्यक्रम असून गेल्यावर्षी मी याच ठिकाणी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली होती. आता आपल्या सोबत दिवाळी साजरी करीत आहे. सर्वसामान्यांसोबत राहून त्यांच्या अडी अडचणीत मदत करण्याचे काम गेले कित्येक वर्ष आम्ही करीतच आहोत. तेच काम आम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व महात्मा फुले जनआरोग्यसारख्या विविध योजनांतून सर्वसामान्यांसाठी करीत आहोत.

Updated on 14 November, 2023 10:10 AM IST

Mumbai News : "सर, तुमच्या मदतीमुळे आम्ही आजारांविरुद्धची लढाई जिंकली आहे, आता फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, आमच्या जीवनातील लढाईवरही आम्ही मात करु.." अशीच काहीशी भावना त्या लहान मुलांच्या आणि त्यांच्या आई – वडिलांच्या डोळ्यातून आज व्यक्त होत होती. निमित्त होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी आयोजित केलेल्या दिवाळी कार्यक्रमाचे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या अर्थसहाय्याने हृदय शस्त्रक्रिया, कॅन्सर, जन्मतः मूकबधिर (कोकलीयर इंप्लान्ट शस्त्रक्रिया), बोन मेरो ट्रान्सप्लांट आदी दुर्धर आजारांवर मात केलेल्या ५० लहान मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवाळी साजरी केली.

'वर्षा' निवासस्थानी आयोजित या विशेष दिवाळी सोहळ्यास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एचसीजी मानवता कॅन्सर हॉस्पिटल नाशिकचे डॉ. राज नगरकर, ठाणे येथील भूमकर हॉस्पिटलचे डॉ.आशिष भूमकर, यशश्री हॉस्पिटल सांगलीचे डॉ.सुधीर कदम, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ.आशुतोष सिंह, डॉ.श्रीनिवास, डॉ.अजय ठक्कर, डॉ.उप्पल, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दिवाळी हा कौटुंबिक कार्यक्रम असून गेल्यावर्षी मी याच ठिकाणी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली होती. आता आपल्या सोबत दिवाळी साजरी करीत आहे. सर्वसामान्यांसोबत राहून त्यांच्या अडी अडचणीत मदत करण्याचे काम गेले कित्येक वर्ष आम्ही करीतच आहोत. तेच काम आम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व महात्मा फुले जनआरोग्यसारख्या विविध योजनांतून सर्वसामान्यांसाठी करीत आहोत. राज्यातील सर्व जिल्ह्यांत आरोग्य सोयी सुविधा पोहोचविण्याचे काम अखंडपणे सुरु असून राज्यातील कुठलाही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी शासन घेईल.

आजार होऊ नये यासाठीच आपण प्रयत्न करीत आहोत. राज्यात जे उपचार उपलब्ध नाही ते परदेशातून उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात कॅशलेस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोरोना काळातही आपण सर्वांनी चांगले काम केले असून यावर्षी दिवाळीसह सर्व सण- उत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरे करीत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी उपस्थित मुलांच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री सहायता कक्षातून मिळालेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री शिंदे व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले. दुर्धर आजारांवर मात केलेल्या उपस्थित लहान मुले आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.

English Summary: The Chief Minister celebrated Diwali with the children who overcame terminal illnesses
Published on: 14 November 2023, 10:10 IST