Onion News :
कांद्यावर केंद्र सरकारने ४० टक्के निर्यातशुल्क लावलं आहे. यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने हे लावले निर्यातशुल्क कमी करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार समित्या मागील ७ दिवसांपासून बंद आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलं आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांची आज (दि.२६) दुपारी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणले की, "केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होतं आहे. वास्तविक कांदा निर्यातीवर शुल्क लावण्याची काहीही आवश्यकता नाही. हा निर्णय शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आहे", असं त्यांनी व्यक्त केलं आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर आज केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि राज्यातील नेत्यांची बैठक होत असून गोयल यांनी शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा, अशीही मागणी शरद पवार यांनी केली आहे. तसंच केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क वाढविल्यामुळे आज कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. यामुळे केंद्र सरकारने यावर तात्काळ तोडगा काढावा, असंही शरद पवार म्हणाले.
राज्यात पेटलेल्या कांदा प्रश्नांवर सरकारने आज निर्णय घ्यावा. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क जास्त आकारल्यामुळे व्यापाऱ्यांनी संप केला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत, असं पवार म्हणाले.
अजित पवारांच्या बैठकीतही कांदा प्रश्नी तोडगा नाही
कांदा प्रश्नी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावली होती. पण आजच्या (दि.२६) या बैठकीत काही तोडगा निघाला नाही. कांदा व्यापाऱ्यांचे मत या बैठकीत जाणून घेण्यात आले आहे. व्यापाऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारशी आणि नाफेडशी संबंधित असल्याने आज पुन्हा सह्याद्री अतिथीगृहावर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या सोबत बैठक होणार आहे, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
Published on: 26 September 2023, 04:48 IST