News

मुंबई – देशात आणि राज्यात यंदा सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल, असा अंदाज असतानाच केंद्र सरकारने परदेशातील जनुकीय बदल केलेल्या जीएम सोयाकेकच्या आयातीस परवानगी दिली आहे.

Updated on 27 August, 2021 11:27 PM IST

देशात आणि राज्यात यंदा सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल, असा अंदाज असतानाच केंद्र सरकारने परदेशातील जनुकीय बदल केलेल्या जीएम सोयाकेकच्या आयातीस परवानगी दिली आहे. जीएम सोयाकेकच्या आयातीचा निर्णय केंद्र सरकारने तात्काळ रद्द करण्याची मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

भारतात आणि महाराष्ट्रातही सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्र हे सोयाबीनचे उत्पादन घेणारे देशातील सर्वात मोठे राज्य असून ४५ लक्ष हेक्टर उत्पादन राज्यात होते. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा हे पीक आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला चांगले दर मिळाल्याने सोयाबीनचे क्षेत्र महाराष्ट्रात वाढले आहे.

यावर्षी सोयाबीनचे चांगले उत्पादन होईल, असा अंदाज असतानाच केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागांतर्गतच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने १२ लाख टन जनुकीय बदल केलेल्या जीएम-सोयाकेक आयातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारात नवीन सोयाबीन येण्यास सुरूवात झाली असतानाच नेमक्या याचवेळी हा आयातीचा निर्णय झाला, या निर्णयानंतर लागलीच सोयाबीनचे भाव सुमारे दोन हजार रुपयांनी खाली आल्याने कृषिमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 

जीएम सोयाकेक आयातीच्या निर्णयाचा मोठा फटका देशातील सोयाबीनच्या दरावर होणार असून त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहे. एकीकडे जनुकीय बदल केलेल्या सोयाबीनच्या उत्पादनास केंद्र सरकारने भारतात अद्याप परवानगी दिलेली नाही, मात्र परदेशातील जीएम सोयाकेकच्या आयातीस परवानगी दिली आहे.

English Summary: The central government should immediately cancel the decision to import GM soybeans - Agriculture Minister Bhuse
Published on: 27 August 2021, 11:27 IST