Rohit Pawar on Central Government : आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा शेतकरी प्रश्नांवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. कांदा मुद्यांवरुन रोहित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचं पाप हे सरकार करत आहे, असंही ते म्हणालेत.
रोहित पवार यांनी ट्विट करत टीका केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठलं की काय अशीच शंका येतेय. शेतकरी आधीच दुष्काळाशी दोन हात करत असताना सुरवातीला कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावलं, याविरोधात ओरड झाल्यानंतर ३ लाख मेट्रिक टन इतक्या तुटपुंज्या कांदा खरेदीचं गाजर दाखवलं आणि आता कुठंतरी चार पैसे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळू लागताच कांदा निर्यातीवर तब्बल ८०० डॉलर इतक्या मोठ्या किमान निर्यात मूल्याचा अडथळा उभा केला.
यामुळं कांद्याचे दर प्रति क्विंटल किमान सरासरी दिड हजार रुपयांनी कोसळलेत. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचं पाप हे सरकार करत आहे. माझी सरकारला विनंती आहे की, सरकारला शेतकऱ्यांची थोडी जरी काळजी असेल तर हे किमान निर्यातमूल्य तातडीने मागे घ्यावं आणि राज्यातील सामान्य माणसासाठी वेळ मिळाला तर राज्य सरकारनेही त्यासाठी केंद्राकडे प्रयत्न करावा, असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सध्या देशभरात कांद्याचे दर चांगलेच वाढले आहे. यामुळे दिवाळीपूर्वी सर्वसामन्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणला आहे. देशातील १६ शहरांमध्ये हा कांदा २५ रुपये किलोने विकला जात आहे. यामुळे बाजार समितीत कांद्याच्या दरात नरमाई दिसून येत आहे.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून कांद्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळी कांद्याला सरासरी ५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. यामुळे घाऊक बाजारात कांद्याचे ८० रुपये किलोवर पोहचले. यामुळे सरकारने सामान्यांना दिलासा देण्यासाठी बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणला.यामुळे कांद्याच्या दरात जवळपास १ हजार रुपयांपेक्षा अधिक नरमाई झाली. परिणामी कांदा उत्पादकांना नुकसान सहन करावे लागले.
Published on: 06 November 2023, 02:16 IST