बंगळुरु: अनेकवेळा आपण आपल्याकडे साधन नाही म्हणून रडत बसतो. साधनांची कमतरता असल्याचं कारण देत आपण परिश्रम करण्यापासून पळ काढतो. पण ज्याची काम करण्याची इच्छा असते, ते लोक कमी साधनातही मोठं यश मिळवत असतात. अशीच बातमी कर्नाटकमधील शेतकऱ्याची आहे. ज्याने आपल्या कमी पाण्याच्या शेतीतून अनेकांना रोजगार दिला आहे. शिवाय पारंपारिक शेतीला त्यांना एक दमदार पर्यायी शेतीची निवड केली आहे.
कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील सिदप्पा यांनी नारळ शेतीतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. नारळ शेतीसोबत त्यांनी केवळ पैसे कमावले नाहीत तर ते इतरांसाठी आदर्श ठरले आहेत. मात्र, सिदप्पा यांनी शेती सुरु केली तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. सामान्य शेतकऱ्यांसारखे ती पारंपारिक शेती करायचे, त्यावेळी शेतीतून मिळणारं उत्पन्न देखील अगदीच सामान्य होते.
डीडी किसानच्या रिपोर्टनुसार सिदप्पा त्यांच्या शेतामध्ये बाजरी, धान यासारखी पिके घेत होते. या पिकांना पाण्याची जास्त गरज होती. मात्र, सिदप्पा यांच्याकडे थोड्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने सिंचनासाठी अधिक खर्च येत असे. सिदप्पा यांनी त्यामुळे काहीतरी वेगळ करण्याचे ठरवले. कृषी विज्ञान केंद्राच्या वैज्ञानिकाशी त्यांनी संपर्क साधला. त्यांच्या सल्ल्यानुसार पाणी उपलब्धतेवर आधारित पिकाची शेती करण्याचे ठरवले. जमिनीचा पोत आणि मातीची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यांनी नारळाची झाडे लावण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला थोड्या क्षेत्रात याची लागवड करण्यात आली होती.
नारळ शेतीतून फायदा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सिदप्पा यांनी त्यांची संख्या वाढवली. हे करत असताना सिदप्पा यांनी वेगवेगळ्या प्रकारची नारळाची झाडे लावली. सिदप्पा आता शेजारच्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये नारळ पाठवतात आणि त्याची चांगली कमाई करतात. सिदप्पा सांगतात की पारंपारिक शेतीतून केवळ घराचा खर्च चालतो. नारळ विक्रीपासून येणाऱ्या पैशांची ते बचत करतात. मोठी रक्कम जमा झाल्यानंतर नारळाच्या शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी ते जमीन खरेदी करतात.
हेही वाचा : पारंपारिक शेतीला फाटा, गाजराच्या शेतीतून भरघोस नफा, गावाचा जिल्ह्यात गाजावाजा
सिदप्पा सांगतात, सुरुवातीच्या दिवसांमध्ये थोडी अडचण निर्माण झाली होती. मात्र, काम सुरु केल्यानंतर मागे वळून पाहण्याची गरज लागली नाही. शेतात कष्ट करण्याची तयारी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कर्नाटकातील वेगवेगळ्या भागातून शेतकरी सिदप्पा यांच्या नारळ शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी येतात.
सिदप्पा यांच्या जवळपासचे लोक रोजगाराच्या शोधात दुसरीकडे जात होते. मात्र, सिदप्पा यांनी नारळ शेतीतून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. सिदप्पा यांच्या शेतात अनेक प्रकारची काम वर्षभर सुरू असतात त्यामुळे अनेक मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
Published on: 23 June 2021, 05:53 IST