News

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. जानेवारी ते जून महिन्याच्या दरम्यान तब्बल १ हजार ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Updated on 10 August, 2020 12:12 AM IST


नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. जानेवारी ते जून महिन्याच्या दरम्यान तब्बल १ हजार ७४  शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप भाजपने केला आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५० हजार कोटींचा पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. कोरोनाचे संकट वाढत आहे, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या याचीच चर्चा होत असताना राज्यात गेल्या सहा महिन्यात तब्ब्ल १ हजार ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. १  जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात एक हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून राज्य सरकार गप्प असल्याचा आरोप ही बावनकुळे यांनी केला.

शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे गेले सहा महिने राज्य सरकारने प्रचंड दुर्लक्ष केले आहे. त्यातच कोरोनाचा संकट आल्याने सर्वच बाजारपेठा संकटात आल्या. कोरोना संकटाच्या काळात जसे इतर बाजारपेठांवर संकट कोसळले. तसेच शेतमाल आणि भाजीपाल्याच्या बाजारपेठांवर ही संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना गेले अनेक महिने कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे नैराश्यात असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे जीवन संपवल्याचे बावनकुळे म्हणाले. रोज सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे यामुळे उघड झाले आहे. मार्च महिन्याच्या अखेरपासून कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्याचा सर्वाधिक फटका राज्यातील शेतमालाच्या बाजारपेठेला परिणामी शेतकऱ्यांना बसला आहे.

English Summary: thackeray governmet doesn't think for farmers - Bjp
Published on: 10 August 2020, 12:08 IST