Tuljapur News : नवरात्री उत्सवासाठी राज्यातील प्रसिद्ध मंदिरे सज्ज झाली आहेत. १५ ऑक्टोबरला घटस्थापना केली जाणार असून नवरात्री उत्सावात सुरुवात होत आहे. यामुळे नवरात्री उत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून तुळजाभवानी मातेचे मंदिर २२ तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. नवरात्री उत्सवात मंदिरात मोठी गर्दी होत असते. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
१५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत असून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. नऊ दिवस घरोघरी घट बसवले जातात. त्याचबरोबर देवीच्या मंदिरातही भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. याच पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानाने भाविकांसाठी मंदिर २२ खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या नवरात्रकाळात होणाऱ्या पुजा आणि दर्शनवेळेत बदल करण्यात आला आहे. १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी भवानी ज्योत येणार असल्याने आणि १५ ते २४ ऑक्टोबर नवरात्र उत्सव असल्याने तसेच २८ ते ३० ऑक्टोबर काळात अश्विन पौर्णिमा असल्याने वेळेत बदल करण्यात आले आहेत.
मंदिर रात्री ११ वाजता बंद होऊन पहाटे १ वाजता चरणतीर्थ होऊन दर्शनासाठी उघडले जाणार आहे. अभिषेक पूजा सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ७ ते ९ या वेळेत केल्या जाणार आहेत. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने याबाबत पत्रक काढले आहे.
दरम्यान, नवरात्री उत्सवात नाशिकच्या सप्तशृंगी देवीच मंदिर भाविकांना २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. १५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे, असं मंदिर प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
Published on: 12 October 2023, 04:58 IST