मुंबई : गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणाला दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करुन मदत जाहीर केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी २१ मे रोजी दिले होते. “करोना संकट असताना त्यात तौते चक्रीवादळाने भर टाकली आहे. शेवटी वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर यावर नुकसान अवलंबून असते. दुर्दैवाने काही मृत्यू झाले आहेत. कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवले जाईल,” असे सांगितले होते.
“मदतीचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत. पंचनामे येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील, त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही,” असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले होते. “पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचे आहे ते करणार,” असेही ते म्हणाले होते. मदतीचे निकष बदलण्यासाठी आपण मोदींसोबत झालेल्या बैठकीत सांगितले होते, त्यासंबंधी पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलणार असल्याची माहिती तेव्हा त्यांच्याकडून देण्यात आली होती.
हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात दाखल; तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा घेणार आढावा
रत्नागिरीत कृषी क्षेत्राचे अंदाजित २५०० हे. आर. क्षेत्राचे नुकसान झाले असून अद्याप पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच २० बोटींचे अंशत: नुकसान झाले असून पंचनामे सुरू आहेत. राज्याचे विधासभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील सध्या कोकण दौऱ्यावर असून नुकसानाची पाहणी करत आहेत. फडणवीस दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री कधी घऱाबाहेर पडणार अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.
Published on: 25 May 2021, 10:49 IST