अवर्षण प्रवण भागातील पावसाचे प्रमाण पाहिल्यास कोरडवाहू पिकासाठी वर्षाला एकच पीक घेण्याची पद्धत शेतकऱ्यात प्रचलित आहे.पाऊसमान खरीपात किवा रब्बीत योग्य असल्यास पिके हातात मिळतात.अन्यथा खरीप तरी जाते किंवा रब्बी तरी जाते. पाऊसमान योग्य नसल्यास दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागते.गेल्या दशकापासून हवामानात झालेला बदल, गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळ, टंचाई इत्यादीला बळीराजा सामोरे जात आहे,अशा परिस्थितीत सुधारित परंतु प्रभावी असे तंत्रज्ञान म्हणजे आंतरपीक पद्धत.आंतरपीक पद्धतीमुळे दुष्काळाची झळ कमी बसते आणि पाऊसमान योग्य असल्यास हेक्टरी अधिक धान्योत्पादन होते. खरीप हंगामात आंतरपीक पद्धती योग्य आहे.
अवर्षणप्रवण भागातील कोरडवाहू क्षेत्रात बाजरी,सूर्यफुल ,तूर,उडीद मूग,हुलगा, मटकी इत्यादी महत्वाची खरीप पिके आहेत.अति उथळ जमिनीवर सुधारित गवताबरोबर हुलगा किंवा मटकी आणि उथळ जमिनीत बाजरी किंवा सुर्यफूल + तूर (२:१) ओळी या प्रमाणात आंतरपीक पद्धतीची शिफारस केली आहे.
कमी पाण्यात,कमी कालावधीत,कमी उत्पादन खर्चात तूर किंवा तूर + आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकरयांना फायदेशीर तर ठरेलच,त्याच बरोबरीने जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.पट्टा पद्धतीत तूर पेरणी केल्यानंतर जोड ओळीतील प्रत्येक तुरीच्या झाडास भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी हवा मिळते,त्यामुळे फुलांचे शेगांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता वाढते.त्यामुळे उत्पादकतेत वाढ होते.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरयांनी फेरपालट म्हणून तुरीच्या पिकाचा विचार केला पाहिजे.तुरीच्या पिकातून जमिनीवर पडणारा पालापाचोळा यापासून मिळणारया सेंद्रिय खतामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. एकरी अर्धा टन सेंद्रिय खत जमिनीस मिळते.तूर पिकामुळे पुढील पिकास एकरी ५० ते ८० किलो नत्र मिळते. तुरीच्या वाढीच्या काळात जमिनीवर पालापाचोळयाच जे आच्छादन तयार होते,त्यामुळे जमिनीवरील ओल्यावर येणाऱ्या लव्हाळा व इतर तणांचे नियंत्रण होण्यास मदत होते.
पारंपारिक पद्धतीत तुरीच्या दोन ओळीतील अंतर दोन ते अडीच फुट ठेवतात.मात्र त्यामुळे तुरीवरील फवारणी करण्यात अनेक अडचणी येतात.तुरीच्या दोन ओळीत ९० से.मी अंतर आणि १८० से. मी.पट्टा परत पुन्हा ९० से.मी. अंतराच्या तुरीच्या जोडओळी या प्रयोगातून तुरीची उत्पादकता वाढविण्याबरोबरच आंतरपिकांचा लाभ मिळवता येईल.तुरीच्या दोन ओळीत जी संरी पडली जाईल,तिच्यात पावसाचे पाणी मुरेल.या ओलाव्याचा तुरीला लाभ होईल.तुरीची मुळे जमिनीत खोलवर जातात,त्यामुळे जमीन भुसभुशीत पोकळ होते.
कोरडवाहू शेती संशोधन केंद्र,सोलापूर येथे अनेक वर्षाच्या प्रयोगातून फायदेशीर असणारी बाजरी+ तूर (२:१) किंवा सुर्यफुल+ तूर (२:१) ह्या आंतरपीक पद्धतीमुळे अनुक्रमे ७० आणि ८४ टक्के उत्पादनात वाढ झाली आहे.
भिन्न कालावधी,भिन्न मूळ रचना असणारी पिके निवडली तर ती एकमेकांबरोबर अनिष्ट स्पर्धा न् करता पूरक ठरतात. उदा. बाजरी + तूर (२:१) किंवा सूर्यफुल + तूर ( २:१ ) आंतरपिकातील बाजरी व सूर्यफुलाचा कालावधी ८० ते ९० दिवसाचा असतो.तर तुरीच्या वाणानुसार १२५ ते १६० दिवसांचा राहील. बाजरी अगर सूर्यफुल काढल्यानंतर राहिलेल्या कालावधीतील पाऊस,सूर्यप्रकाश,जमिनीतील ओलावा,अन्नद्रव्ये व जागा ह्याचा तुरीच्या वाढीस उपयोग होतो. बाजरी/सूर्यफुलाची मुळे तंतुमय असल्यामुळे जमिनीच्या वरच्या थरातील ओलावा,अन्नद्रव्याचे चे शोषण होते. तर तुरीस सोटमूळ असल्यामुळे जमिनीतील खालच्या थरातील अन्नद्रव्ये व ओलाव्याचे शोषण होते.त्यामुळे ती एकमेकास पूरक ठरतात.
तूर हे कडधान्य पीक असल्यामुळे त्याच्या मुळावरील गाठीत रायझोबियम नावाचे सुक्ष्म जीवाणू असतात ते हवेतील नत्र शोषून जमिनीत गाडतात आणि पुढील पिकास उपलब्ध करून देतात, त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते.तूर तयार होते वेळी निम्मा पाला जमिनीवर पडतो.त्यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून पोत सुधारतो.अशा दिव्दल धान्य पिकांचा समावेश आंतरपीक पद्धतीत केल्यास जमिनीची सुपिकता व पोत सुधारून टिकून राहते.
आंतरपिकांसाठी निवडावयाच्या तुरीच्या जाती या मध्यम मुदतीच्या असाव्यात.अलीकडच्या काळात तूर + सोयाबीन (१:३ किंवा १:४) पद्धतीने पेरल्यास दोन्ही पिकांचे चांगले उत्पादन येत असल्याचे दिसून आले आहे.सोयाबीनच्या ओळीमध्ये ३० से.मी. तर दोन रोपांमध्ये १० से.मी. अंतर ठेवावे आणि सोयाबीनच्या तीन ओळीनंतर एक ओळ तुरीची पेरावी.तुरीच्या दोन ओळीतील अंतर १२० से.मी. येते.तुरीच्या दोन रोपातील अंतर २० से.मी. ठेवावे.सोयाबीन बियाणे ६० ते ६५ किलो प्रती हेक्टर तर ५ किलो तुरीचे बियाणे प्रती हेक्टेरला पुरेसे होते.
आंतरपीक पद्धतीमुळे कोणत्याही पिकाचे क्षेत्र कमी न होता नवीन पिकाखाली अधिक क्षेत्र आणता येते आणि उत्पादनात स्थिरता येते. या पद्धतीत खतांचा सुयोग्य आणि पुरेपूर वापर होतो. आंतरपीक पद्धतीत दोन पिके असली तरी मुख्य एका पिकासाठीच देण्याची शिफारस असल्याने दिलेले खत दोन्ही पिकास उपयुक्त ठरते.
बाजरी + तूर अगर सूर्यफुल + तूर या आंतरपीक पद्धतीत बाजरी/सूर्यफुल काढल्यानंतर मशागत करणे महत्वाचे असते .कारण मुख्य पीक निघाल्यानंतर,दुसऱ्या पिकांकरिता ओळ टिकवून ठेवणे गरजेचे आहे.त्याकरिता पीक काढल्याबरोबर कुळव चालवून तण व धसकटे उपटून काढून तेथेच वाळू द्यावीत.
आंतरपीक पद्धतीचे फायदे
•वर्षात दोन/ तीन पिके घेता येतात.
•जमिनीस कमी मशागत लागते.
•पावसाचा व सूर्यप्रकाश कालावधीचा उपयोग करता येतो.
•जमिनीतील ओलावा,अन्नद्रव्ये व जागा यांचा पुरेपूर उपयोग होतो.
•जमिनीची सुपिकता व पोट सुधारतो.
•हेक्टरी अधिक उत्पादन होते.
•विपरीत व प्रतिकूल हंगामात एखादे तरी पीक हाती येते.
•एकूण मशागत खर्च कमी हेक्टरी नफ्याचे प्रमाण अधिक
आंतरपीक पद्धतीमुळे अनेक प्रकारचे फायदे मिळून, शेतकरी बंधूना जास्त नफा मिळण्यास मदत होते आणि ते ही कमी जागेतून व कमी वेळात.शेतकरीबंधूनी या आंतरपीक पद्धतीचा अवलंब आपल्या शेतावर अवश्य करावा.
लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे,मृद शास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विदयापीठ ,राहुरी, मो.९४०४०३२३८९
डॉ. सचिन सदाफळ ,सहायक प्राध्यापक ,कृषि विस्तार प्रसारण केंद्र,महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी
Published on: 07 June 2024, 01:24 IST