नवी दिल्ली: केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2018’ स्पर्धेत राज्यातील सातारा जिल्हयाने बाजी मारत देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आज गांधी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सातारा जिल्ह्याला सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक सभागृहात केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने ‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदे’चे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ‘स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण 2018’ पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेश, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती, केंद्रीय शहरी व गृहनिर्माण मंत्री हरदिपसिंग पुरी, केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा आणि केंद्रीय पेयजल व स्वच्छता राज्य मंत्री रमेश जिगाजीनागी मंचावर उपस्थित होते. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल कार्यक्रमात सहभागी झाले. यासह कार्यक्रमास 68 देशातील प्रतिनिधी उपस्थित होते.
केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण 2018’ मोहिमेअंतर्गत दिनांक 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत देशभरातील सर्वच 718 जिल्हयांमध्ये स्वच्छतेच्या विविध निकषांवर सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यांतील निवडक गावे याप्रमाणे 6 हजार 980 गांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. महाराष्ट्रातील 34 जिल्हयांमधील 540 गावांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात विविध मानकांमध्ये सरस ठरून सर्वाधिक गुण संपादन करणारा सातारा जिल्हा देशात प्रथम आला आहे.
सातारा जिल्ह्याची सर्व निकषांवर सरस कामगिरी
सातारा जिल्हयातील 16 गावांची केंद्रीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली. तपासणी घटकांमध्ये प्रामुख्याने गावरस्त्यावरील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, बाजारस्थळे, धार्मिक ठिकाणांची शौचालय उपलब्धता त्यांचा वापर तसेच सार्वजनिक परीसरांची स्वच्छता यांची तपासणी करण्यात आली. यासाठी केंद्रशासनाने कंतार या त्रयस्थ संस्थेकडून परिक्षण करण्यात आले. यानुसार एकूण 100 गुण ठरविण्यात आले. यात संख्यात्मक व गुणात्मक आधारावर सेवास्तर प्रगतीचे 35 गुण व ग्रामस्थांच्या प्रतिसादाचे 35 गुण व थेट परिक्षणाचे 30 गुण यांद्वारे अंतिम गुण ठरविण्यात आले. सर्वनिकषांवर सातारा जिल्हा सरस ठरला असून जिल्हयाने देशात सर्वाधिक गुण मिळविले आहेत.
प्रधानमंत्री यांच्या हस्ते सातारा जिल्ह्याला गौरविण्यात आले. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव विजयसिंग नाईक निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
Published on: 02 October 2018, 09:43 IST