मुंबई- शेतीमालाच्या बाजारभावासाठी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या शेतकरी संघटनेनं नव आंदोलन पुकारलं आहे. केंद्र सरकारच्या एफआरपी तीन टप्प्यांत देण्याच्या निर्णय विरोधात डिजिटल आंदोलनाची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या दामासाठी ट्विटरवर #एकरकमी_FRP ही हॅशटॅग मोहिम चालवणार असल्याची माहिती संघटनेचे प्रवक्ते रणजित बागल यांनी दिली आहे.
निती आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार कडुन एफआरपी (FRP) तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला जात आहे. यामुळे राज्यातील सर्वसामान्य शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भविष्यातील शेतकऱ्यावरील आर्थिक संकट टाळण्यासाठी या मोहिमेतून वाचा फोडणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
एफआरपीच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानीने आक्रमक भूमिका घेतली आहे. रस्त्यावरच्या थेट लढाईत स्वाभिमानीने मोठा लढा उभारला आहे. तसेच यापूर्वी 12 सप्टेंबर पासून मिस्डकॉल मोहिम देखील संघटनेकडून चालवली जात आहे. या मोहिमेस शेतकरी व राज्यातील शेतकरी पुत्रांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
डिजिटल आंदोलन:
डिजिटल आंदोलनाची हाक देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि.25 सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्व सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर #एकरकमी_FRP या हॅशटॅगचा ट्रेंड घेतला जाणार आहे. या मोहिमेत राज्यातील सर्व राजकीय तसेच बिगर राजकीय संघटना यांनी या हॅशटॅग मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी केले आहे.
तीन टप्प्यांत अशी विभागणी:
नीती आयोग आणि कृषिमूल्य आयोग कारखानदारांचे हित पाहत असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. 60 टक्के रक्कम ऊस तुटल्यावर, 14 दिवसांत उर्वरित 20 टक्के आणि दोन आठवड्यांनी राहिलेली 20 टक्के रक्कम त्यानंतर 30 दिवसांत एफआरपी देण्याच्या निर्णयावर टास्क फोर्सने राज्यांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर या वादाला तोंड फुटले आहे.
Published on: 25 September 2021, 11:24 IST