ठाणे : देशाची शान असलेल्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृती चिरंतन ठेवणारे स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालयाचे (गुरुकुल) भूमिपूजन ठाण्यात करण्यात आले आहे. हे गुरुकुल भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाच्या “महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास” या योजनेंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील रेप्टोक्रॉस आरक्षित भूखंड, वर्तकनगर, ठाणे येथे भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ गायिका संगीतकार श्रीमती उषा मंगेशकर, आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आज डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सर्व युगांप्रमाणे ‘लता युग’ हे अविस्मरणीय आहे. त्यांची गाणी आजही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लतादीदींची गाणी सर्वांनाच हवीहवीशी वाटतात. या विद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य शासनाकडून 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ठाण्याला संगीत आणि साहित्याचा मोठा वारसा आहे. संगीत क्षेत्रातील दिग्गज पं. राम मराठे, पी.सावळाराम, श्रीनिवास खळे हे ठाण्यातीलच. भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) गायन-संगीत प्रेमींना निश्चितच उपयुक्त ठरेल. या वाटचालीत शासन मंगेशकर कुटुंबियांच्या कायम सोबत असेल.
ठाण्यातील इतर विकासकामेही लवकरच पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. ठाण्याचा सर्वांगीण विकास होत आहे. मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर सुशोभीकरण, स्वच्छतेकडेही कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. त्याच धर्तीवर ठाण्यातही काम सुरु केले जाणार आहे. जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू असून 50 कोटी रूपये निधी दिला आहे. ‘वापरा आणि फेका’ ही आपली संस्कृती नाही. जुना अनमोल ठेवा जपायला हवा, त्याचे संवर्धन करायला हवे. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्यावर खूप प्रेम होते, मी त्यांच्याच आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो, त्यांच्या विचारधारेवरच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहे.
Published on: 20 November 2023, 09:48 IST