राज्य सरकारच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त 'आनंदाचा शिधा’ दिला जात आहे.परंतु अनेक ठिकाणी डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या, निकृष्ट दर्जाचे पामतेल अशा पद्धतीचे साहित्य वाटप केल्याची तक्रारी येत आहेत.यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला.
दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. या शिध्यात रवा, चना डाळ, साखर, खाद्यतेल, मैदा आणि पोह्याचा समावेश आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी अशा 1 कोटी 66 लाख 71 हजार 480 शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वाटप झाल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्वीटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गोरगरीब जनतेला दिवाळी सणासाठी दिला गेलेला 'आनंदाचा शिधा' हा खाण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या, निकृष्ट दर्जाचे पामतेल अशा पद्धतीचे साहित्य वाटण्यात आले. हि गोरगरीब जनतेची शासनाने केलेली क्रूर अशी थट्टा आहे. गोरगरीबांच्या दिवाळीची अशी थट्टा करणाऱ्या शासनाचा तीव्र निषेध अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली.
Published on: 16 November 2023, 02:24 IST