काल दि 5 नोव्हेंबरपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. मागिल काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नूकसान झाले असून राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असून, जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
दरम्यान लोकसभेत बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्यात की, महाराष्ट्र आणि माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहे. काही जिल्ह्यात ओला दुष्काळ पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी पाऊसच झाला नाही. त्यामुळे अशाठिकाणी कोरडा दुष्काळ पडला आहे. द्राक्ष, कांदा, केळी, गहू, धान, कापूस, सोयाबीनसह पाल्याभाज्यांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे दुधाला भाव मिळत नाही आहे. पश्चिम महाराष्ट्रमधील नाशिक, बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आला असल्याच्या सुळे म्हणाल्या आहेत.
शेतकरी निसर्गाच्या संकटांमुळे अडचणीत आहे. दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दर देत नसून याबाबतच्या धोरणांत सातत्याने चढउतार होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. हि मोठी भीषण स्थिती असून शेतकरी प्रचंड मोठ्या कोंडीत अडकला आहे. त्यांना आर्थिक आधार देऊन पुन्हा नव्याने उभा करण्याची गरज आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करावी, केंद्रीय पथकाने तत्काळ महाराष्ट्रात जाऊन पाहणी करावी. महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे बँकेतून त्यांना कर्ज दिले पाहिजे. तसेच त्यांना नवीन कर्ज देखील देण्यात यावे, शासनाने तातडीने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे यासह वातावरणातील बदलांमुळे झालेल्या नुकसानीचे व्यवस्थापन करण्याबाबत योग्य नियोजन करावे अशा मागण्या सुप्रिया सुळे यांनी केल्या आहेत.
Published on: 05 December 2023, 02:37 IST