राज्यात सोयाबीन मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो, महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशात सोयाबीन उत्पादनात दुसऱ्या स्थानी काबीज आहे. खरीप हंगामात उत्पादित केलेल्या सोयाबीनला विक्रमी बाजार भाव प्राप्त झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात देखील सोयाबीन लागवडीला पसंती दर्शवली आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील उन्हाळी सोयाबीन लागवड नजरेस पडत आहे. जिल्ह्यात पेरले गेले उन्हाळी सोयाबीन चांगल्या पद्धतीने उतरल्याचे चित्र दिसत आहे, तसेच आता सोयाबीन पीक जोमाने बहरत आहे.
मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कापूस मूग उडीद या पारंपरिक पिकासमवेतच मोठ्या प्रमाणात सोयाबीन लागवड करण्याकडे मोर्चा वळवला असल्याने जिल्ह्यातील सोयाबीनचे क्षेत्र लक्षणीय वधारल्याचे समोर आले आहे. खरीप हंगामात सोयाबीन पिकातून जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र असे असले तरी गेल्या दोन वर्षापासून पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या खरीप हंगामात देखील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पावसाच्या लहरीपणामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. गेल्या दोन वर्षापासून खरीप हंगामात सोयाबीन पीक पदरी पडत नसल्याने जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी उन्हाळी हंगामात करण्याचे ठरवले. या अनुषंगाने पूर्णा तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावर चालू रब्बी हंगामात उन्हाळी सोयाबीन लागवड नजरेस पडत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असेच काही शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात उन्हाळी सोयाबीन लागवड केल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यात पेरणी केलेले उन्हाळी सोयाबीन सध्या फुल जोमात आहे, व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना उन्हाळी सोयाबीन पिकातून विक्रमी उत्पादनाची आशा देखील आहे. यावर्षी जिल्ह्यातील प्रमुख धरणे सिद्धेश्वर येलदरी पाण्याने तुडुंब भरली असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस या पिकासमवेतच उन्हाळी सोयाबीन पिक लागवडीला पसंती दर्शवली आहे. गोदावरी नदी देखील यावर्षी तुडुंब भरून वाहत असल्याने गोदाकाठच्या अनेक गावातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पसंती दर्शवली असून गोदाकाठचा संपूर्ण परिसर उन्हाळी सोयाबीन लागवडीने हिरवागार झाला असल्याचे दृश्य यावेळी नजरेस पडले.
जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीच्या अनुषंगाने उन्हाळी हंगामात सोयाबीन पिकाची लागवड केली आहे, उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनला कसा बाजार भाव प्राप्त होतो हे विशेष बघण्यासारखे असेल.
Published on: 23 January 2022, 10:18 IST