नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. जिल्ह्यातील विशेषता कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा,या अहिराणी भाषिक पट्ट्यात उन्हाळी कांद्याची लागवड नेहमीच लक्षणीय बघायला मिळते. गेल्या हंगामात देखील या परिसरात उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात लावला होता, मात्र गेल्या हंगामात शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकटाना सामोरे जावे लागले होते, मार्चमध्ये म्हणजे गेल्या हंगामातील कांदा काढणीच्या आधी आलेल्या अवकाळी नामक संकटामुळे जिल्ह्यातील उन्हाळी कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, या पावसामुळे उत्पादनात मोठी घट घडून आली होती. मात्र असं असले तरी शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा बाजारभाव कांद्याला मिळत नव्हता, परिणामी उन्हाळी कांद्याची साठवणूक करण्याचा निर्णय परिसरातील अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी डिसेंबर पर्यंत कांद्याची साठवणूक करून ठेवली, शेतकऱ्यांनी मागच्या महिन्यापर्यंत उन्हाळी कांदा अगदी टप्प्याटप्प्याने विक्री केला.
मात्र असे असले तरी, उन्हाळी कांद्याच्या दरात हंगामाच्या शेवटी पर्यंत काहीच हालचाल बघायला मिळत नव्हती दर हे एकदम स्थिरावले होते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकातून पाहिजे तेवढे उत्पन्न प्राप्त झाले नाही. आधीच उत्पादन कमी होते त्यामुळे शेतकऱ्यांनीं मोठ्या आशेने कांदा साठवला आणि बाजार भाव वधारला तेव्हाच कांद्याची विक्री करायची असं ठरवलं. मात्र शेतकऱ्यांच्या आशेवर आता संपूर्ण पाणी फिरलेलं दिसत आहे, आता उन्हाळी कांद्याची आवक पूर्णता मंदावलेली दिसत आहे, उन्हाळी कांदा आता उचलबांगडी झालेला आहे. मात्र शेवटीपर्यंत उन्हाळी कांद्याला मनासारखा भाव मिळाला नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्याचे चित्र परिसरात बघायला मिळत आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनीं बाजारभाव कधी-ना-कधी वधारतील या आशेने तब्बल 8 महिने कांदा चाळीत डांबून ठेवला मात्र कांद्याचे बाजारभाव हंगाम संपला तरी वधारले नाहीत. कांदा उत्पादन आधीच कमी आणि त्यात तो जास्त काळ साठवल्याने अजून त्यात घट बघायला मिळाली शिवाय त्याची क्वालिटी देखील कमालीची खालावली गेली.
त्यामुळे गेल्या हंगामात उन्हाळी कांद्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना परत एकदा कांद्याच्या बाजारभावातील लहरीपणा दाखवला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती ही खाया पिया कुछ नही और गिलास तोडे बारा आना अशीच झालेली बघायला मिळाली.
Published on: 06 January 2022, 08:16 IST