मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. शेतीत होत असलेले नुकसान आणि वाढत जाणारे कर्ज यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या विवंचनेतून आता पुन्हा एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. नांदेड जिल्ह्यातील आदमपूर येथील हज्यपा मष्णाजी झेलते आणि परभणी शहरातील पाटील विहीर परिसर येथील विलास रामराव रोकडे ही आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत.
परभणीच्या पाटील विहीर परिसरात राहणारे विलास रामराव रोकडे या शेतकऱ्यानेही गळफास घेवून जीवन संपवलं आहे. यावर्षी कमी पाऊस झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली. बँकेचे कर्ज , पिकाचा खर्च, तसेच औषधांची उधारी या समस्यांना कंटाळून त्यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आले आहे.
तसेच नांदेड आदमपूर येथील हज्यपा मष्णाजी झेलते या शेतकऱ्याने 5 नोव्हेंबर रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पावसामुळे शेतातील पिके वाया गेल्याने नापिकी व कर्जामुळे आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. हज्यपा मष्णाजी झेलते हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतातील पिकांवर काढलेले कर्ज कसे फेडायचे या तणावात हज्यपा असायचे. दरम्यान, शनिवारी रात्री घरातील सर्वजण घरी झोपलेले असताना पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याने घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. सकाळी उठल्यावर घरच्यांना हज्यपाने आत्महत्या केल्याचे समजले.
मागील काही वर्षांपासून मराठवाड्यात सतत आसमानी आणि सूलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर्षी कमी पाऊस झाल्याने अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावात पाणीटंचाई वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने आत्तापासून पाण्याचे नियोजन करण्याची मागणी होत आहे. या गोष्टींना त्रासून शेतकरी त्यांची जीवनयात्रा संपवत आहेत.
Published on: 06 November 2023, 04:40 IST