Sugarcane News : ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पुण्यात झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे. पुण्याच्या साखर संकुलात जेष्ठ नेते शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थित बैठक झाली. यावेळी या बैठकीत ऊसतोड मजूराच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तसंच ऊसतोड आणि मुकादम यांच्या दरात वाढ करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीनंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर आज पुण्याच्या साखर संकुलात जेष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या आणि माझ्या प्रमुख उपस्थितीत पवार साहेबांच्या आणि माझ्या ऊसतोड कामगार लवादाची बैठक पार पडली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनंतर आज प्रथमच ऊसतोड मजुरांच्या न्याय मागण्यांची पूर्तता करणारा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत घेण्यात आला याचे मनस्वी समाधान आहे.
ऊसतोड मजुरांना ३४% दरवाढ तर मुकादमांना १% कमिशन वाढ देण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. राज्यातील ऊसतोड मजुरांचे हित हे माझ्यासाठी सर्वतोपरी आहे. आजच्या बैठकीतही मी त्याच भूमिकेतून माझे विचार मांडले. राज्यातील ऊसतोड मंजूर बांधव आणि संघटनांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करून माझ्या भूमिकेला पाठींबा दिला आणि लवादाचा निर्णय मान्य केला त्यासाठी सर्वांचे आभार मानते आणि सर्व ऊसतोड मजूर बांधवांचे अभिनंदन करते!
ऊसतोड भाववाढीच्या संदर्भातील बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.पूर्वी ऊसतोड मजूरांना २७३ रुपये प्रतीटन उसतोडणी मिळत होती. आता त्यात ३४ टक्के वाढ. अर्थात त्यात ९२.८२ रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मजूरांना ३६५.८२ रुपये प्रतीटन ऊसतोडणी मिळणार आहे. ही भाववाढ चालू हंगाम आणि पुढील दोन वर्षाचे हंगाम असणार आहे. याशिवाय मुकादम यांना १ टक्का कमिशन वाढ देण्यात आल्यामुळे मुकादम यांचे कमिशन २० टक्के होणार आहे.
ऊसतोड मजूरांची बैठक पार पडल्यानंतर ऊसतोड मजूर यांच्यावर अभ्यास करणारे डॉ. सोमिनाथ त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात की, काल (दि.०४ जानेवारी) ऊसतोड भाववाढीच्या संदर्भातील सहावी बैठक साखर संकुलात उसतोड कामगार संघटना आणि राज्य साखर संघ यांच्यातील संपन्न झाली. या बैठ्कीतून सकारात्मक-नकारात्मक असा मध्यबिंदू करत ३४ टक्के भाववाढीवर एकमत करत मार्ग काढण्यात आला. मात्र त्यासाठी सहकाराच्या बाजूने शरद पवार यांना तर कामगार संघटनांच्या बाजूने पंकजाताई यांना पुढाकार घ्यावा लागला. पूर्वी २७३ रुपये प्रतीटन उसतोडणी मिळत होती. आता ३४ टक्के वाढ. अर्थात त्यात ९२.८२ रुपयाने वाढ झाली. एकूण ३६५.८२ रुपये प्रतीटन ऊसतोडणी मजुरांना मिळणार आहे. ही भाववाढ चालू हंगाम आणि पुढील दोन वर्षाचे हंगाम असणार आहे. याशिवाय मुकादम याना १ टक्का कमिशन वाढ देण्यात आली आहे. अर्थात मुकादम कमिशन २० टक्के होईल.
पाचव्या बैठकीपर्यंत तडजोडी करत कामगार संघटनांची ४० टक्के भाववाढीची मागणी होती. तर राज्य साखर संघ यांच्याकडून 29 टक्के भाववाढ देण्याचा प्रस्ताव होता. दोन्ही बाजूने आपापल्या बाजू ताणून धरल्या जात होत्या. त्यामुळे पेच निर्माण झाला होता. त्यात पेचातून ३४ टक्के भावाढीस दोन्ही बाजूने मान्यता देत मार्ग काढण्यात आला, यासाठी सकारात्मक आहे. तर राज्याच्या शेजारील राज्यात ४०० पेक्षा जास्त प्रतीटन दर आहे. तसेच राज्यात हार्वेस्टिंग मशीनला ४५० ते ५५० रुपये प्रतीटन दरम्यान तोडणीस मिळतात. या दोन्हीपैकी एकाच्या तरी समान उसतोडणीचा भाव (दर) समान आणणे गरजेचे होते, त्यास मान्यता दिली नाही. त्यामुळे उसतोडणीचा योग्य मोबदला मिळत नाही, यासाठी नकारात्मक आहे.
एकंदर कामगार संघटना आणि राज्य साखर संघ यांना गेल्या पाच बैठकांमधून मार्ग काढता आला नाही. म्हणून शेवटी राजकीय नेतृत्वाला (लवादाला) यामध्ये हस्तक्षेप करून मार्ग काढावा लागला. एका अर्थाने २०२० साली कामगार संघटनांनी लवाद नाकारला होता. मात्र यावेळी पुन्हा लवाद पुढे आणून मध्यबिंदू साधावा लागला. हा लवाद आपोआप पुढे आला नाही, त्यासाठी गेल्या पाच बैठकांची प्रकिया आणि छुपे राजकारण घडले याची पार्श्वभूमी आहे.
Published on: 05 January 2024, 01:59 IST