पश्चिम महाराष्ट्र सोडून महाराष्ट्र आणि विदर्भ भागात सध्या चांगला अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यंदा ऊस क्षेत्रात चांगलीच वाढ झालेली आहे त्यामुळे ऊस अंतिम टप्यात असला तरी अजून उसाची तोड बाकीच आहे. जास्त दिवस ऊस फडात राहिला तर त्याच्या वजनात सुद्धा घट येते तसेच उत्पादनात सुद्धा घट येते. मराठवाडयात कधी न्हवते गुऱ्हाळ चालू होत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून ऊस उत्पादक तोडीची प्रतीक्षा करत होते मात्र यंदा कारखान्यांचे नियोजन नसल्यामुळे ऊस हा फडातच राहिला त्यामुळे शेतकऱ्यांचे मनात भीती निर्माण झाली. या कारणांमुळे गुऱ्हाळाची संख्या वाढत चालली आहे. गुऱ्हाळामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहेच पण सोबतच गुऱ्हाळ चालवणाऱ्या व्यक्तीला ऊस सुद्धा भेटला आहे. एवढेच नाही तर स्वतः गुऱ्हाळ चालक ऊस तोडणी करत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. एक हजार आठशे ते २ हजार प्रति क्विंटल असा दर मिळत आहे.
गावरान गुळाला मागणीही अधिक :-
गुऱ्हाळ चालक शेतकऱ्यांना चोख व्यवहार देत असल्याने ऊस उत्पादक ऊस देत आहेत. ऊसतोडणी रखडल्यामुळे नांदेड मधील गुऱ्हाळांची संख्या वाढत आहे. गुऱ्हाळवर रानभेंडी चा वापर करत असल्यामुळे नैसर्गिकरित्या गूळ तयार होत आहे जे की ग्राहक सुद्धा या गुळाला पसंद करत आहेत. बजारपेठेत जेवढा गुळाचा दर असतो त्या दरापेक्षा गुऱ्हाळात दर कमी आहे. शेतकऱ्यांच्या रखडलेल्या उसाला चांगलाच मार्ग भेटला असून गुऱ्हाळ ही चालू झालेत सोबतच लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाला.
तोडणी होताच नगदी पैसेही :-
कारखान्याला ऊस पोहचवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप कष्ट घ्यावे लागते. शेतकऱ्यांची एवढी धावपळ होते मात्र तरी सुद्धा कारखाने वेळेत बिल अदा करत नाहीत. गुऱ्हाळ चालक स्वतः ऊसतोड करत आहेत. ऊस तोड झाल्याने लगेच गुऱ्हाळ चालक पैसे सुद्धा देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना समाधान वाटत आहे. शेतकऱ्यांचे असे मत आहे की कारखाना ऐवजी गुऱ्हाळ च परवडत आहे.
परस्थितीने का होईना वाढले गुळाचे उत्पादन :-
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर भागात मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळाची संख्या आहे. कारण कोल्हापूर परिसरात जास्त ऊस क्षेत्र असल्यामुळे गुऱ्हाळांची संख्या सुद्धा जास्त आहे. तसेच मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात पाणी उपलब्ध झाले असल्यामुळे ऊस क्षेत्रात सुद्धा वाढ झालेली आहे. यंदा ऊस क्षेत्र वाढले असल्यामुळे उसतोडीचा प्रश्न उदभवला जे की हंगाम जरी उलटला असला तरी अजून ऊस फडातच आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी गुऱ्हाळला पसंदी दिली.
Published on: 08 March 2022, 05:45 IST