गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ऊस बिलातून वीजबिल वसूल करण्याच्या चर्चेला मोठे उधाण आले आहे. सरकारने याबाबत कधीच आपली मंशा जाहीर केली आहे, सरकारने ऊस बिलातून वीज बिल वसूल केले जाईल असे संकेत देखील नुकत्याच काही दिवसांपूर्वी दिले होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलातून वीजबिल वसूल करण्याचा सरकारचा निर्णय हवेत विरला असे वाटले होते. पण मात्र आता राज्यात ऊस बिलातून वीजबिल वसुली करण्याचा सिलसिला सुरू होत असल्याचे नजरेस पडत आहे. त्यामुळे ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यात विक्री साठी पाठवला आहे तसेच आगामी काही दिवसात जे शेतकरी ऊस विक्रीसाठी कारखान्यात दाखल होणार आहेत अशा शेतकऱ्यांनी आता सावध होणे गरजेचे आहे.
आता साखर कारखानदार ऊस बिलातून वीजबिल वसुली करत आहेत. ऊस बिलातून वीज बिल वसुलीची घटना पश्चिम महाराष्ट्रातून समोर येत आहे. विभागातील कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यात एका ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून वीज बिल वसुलीचे प्रकरण उघडकीस आले आहे. अभिजीत पाटील या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कोल्हापूरच्या जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यात विक्रीसाठी नेला असता त्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांच्या बिलातून वीज बिलाची कपात केली गेली आहे. त्यांना न सांगता तसेच कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीजबिल वसूल केल्यामुळे अभिजीत यांचा कारखान्यावर रोष आहे.
ऊस बिलातून वीजबिल वसुलीच्या शासनाच्या धोरणास स्वाभिमानी शेतकरी संघटना आधीपासून विरोध दर्शवित आहे. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मते, साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून वीजबिल वसूल करण्याचा कुठलाच अधिकार नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय साखर कारखान्याला एकच छदाम देखील वसूल करण्याचा अधिकार नाही. स्वाभिमानी संघटनेच्या विरोधास साखर कारखाने जुमानत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळेच राज्यात सर्वत्र मोठा विरोध होत असताना देखील साखर कारखाने आता शेतकऱ्यांच्या बिलातून वीजबिल वसुली करत आहेत. विशेष म्हणजे वीज बिल वसुली बाबत शेतकऱ्यांना कुठलीच पूर्व सूचना दिली जात नाही. राजू शेट्टी यांनी सांगितले की, कारखानदारांनीजर ऊस बिलातून अशा पद्धतीने विज बिल वसूल केले तर त्यांच्यावर आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करू.
या सर्व प्रकरणावर कारखान्याचे चेअरमन आमदार प्रकाश आवाडे यांना विचारणा केली असता राज्य शासनाने वीज बिल वसुली करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी यावेळी कथन केले. आवाडे यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांच्या परवानगीनेच बिलातून वीजबिल वसूल केले जाईल. मात्र वास्तवात तसे होताना दिसत नाही कारण की अभिजीत पाटील या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलातून वीजबिल वसुलीची कुठलीच पूर्वकल्पना न देता त्यांच्या परवानगीविना वीज बिलाची वसुली केली गेली आहे. त्यामुळे प्रकाश आवाडे आमदार असून देखील किती सर्रासपणे खोटे बोलत आहेत हे उघड झाले.
Published on: 04 February 2022, 10:13 IST