Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या कारखान्यांनी प्रती टन २९५० ते ३००० रुपये दर जाहीर केला आहे अशा सर्व कारखान्यांनी प्रतिटन सरसकट ३१०० रुपये दर देवून ऊस दराबाबतची कोंडी फोडावी, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ताराराणी सभागृहात ऊस दरासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत केले.
यावेळी व्यासपीठावर खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, प्रादेशिक सह संचालक (साखर) अशोक गाडे, विशेष लेखा परीक्षक १ (साखर) धनंजय पाटील आदी उपस्थित होते.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऊसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यातच फक्त ९० दिवस साखर कारखाने चालू राहतील असा अंदाज आहे. यामध्ये शेतक-यांचे नुकसान होता कामा नये. जिल्ह्यातील रयत, बळीराजा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी ही बाब समजून घ्यावी. चक्काजाम आंदोलनासारखे आंदोलन करु नये असे आवाहनही त्यांनी केले.
स्वाभिमानी संघटनेच्या मागणीप्रमाणे याविषयीच्या आय. आय. टी. कानपूरच्या अहवालाप्रमाणे अभ्यास करुन शेतक-यांना अधिकचे पैसे साखर कारखानदार कशा पध्दतीने देवू शकतील याबाबतचा अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती २१ नोव्हेंबर, २०२३ अखेर अहवाल सादर करेल व त्यानुसार अभ्यासाअंती संबंधित कारखाने शेतक-यांना मागील वर्षीच्या एफ.आर.पी. ची अधिकची रक्कम अदा करतील आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्यांना आवश्यक तो कर्ज पुरवठाही यासाठी करेल, सध्या साखर कारखाने वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीत असल्याने सर्वांना एकच रक्कम अतिरिक्त देण्यास सांगणे अयोग्य ठरेल असेही पालकमंत्र्यांनी सूचित केले.
जिल्ह्यातील साखर कारखानदारी व्यवस्थित सुरु रहावी. ती मोडकळीस आल्यास येथील शेतकरी उध्दवस्त होण्याची भीती आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊसाला प्रती टन किमान ३५०० तसेच गतवर्षीचा दुसरा हप्ता ४०० रुपये मिळावा अशी मागणी या बैठकीत केली. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व सहकारी-खासगी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक, व्यवस्थापकीय संचालक तसेच विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
Published on: 17 November 2023, 02:19 IST