News

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सारखं कारखानदारी आहे. अनेकजण यावरच अवलंबून आहेत. उसाचे प्रमुख पीक हे महाराष्ट्रात घेतले जाते. असे असताना आता साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

Updated on 22 February, 2022 10:50 AM IST

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सारखं कारखानदारी आहे. अनेकजण यावरच अवलंबून आहेत. उसाचे प्रमुख पीक हे महाराष्ट्रात घेतले जाते. असे असताना आता साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. राज्यात यावर्षी ऊस लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक कारखान्यात दहा टक्के इथेनॉलचे उत्पादन करुनही साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता आहे, याबाबत साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी माहिती दिली आहे. यामुळे आता ऊस उत्पादकांचे देखील याकडे लक्ष लागले आहे. वाढीव क्षेत्रामुळे उसाचे दर कमी होण्याची शक्यता अनेक शेतकऱ्यांना सतावत आहे.

दरम्यान, यावर्षी साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. देशाला दरवर्षी 265 लाख टन इतक्या साखरेची आवश्यकता असते परंतु या वर्षी या पेक्षाही मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे आणि गाळप हंगाम सुरू असल्याने हे उत्पादन अजूनही वाढणार आहे. अनेक कारखान्यांमध्ये जुनीच साखर उपलब्ध आहे. त्यामुळे साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे केवळ साखर खाणारांना दिलासा मिळेल मात्र शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. साखर 3300 रुपये प्रति क्विंटलवर गेली असताना आता ३१०० रुपये प्रति क्विंटलवर आली आहे.

तसेच पुढील काळात हे भाव तीन हजाराच्या जवळपास असण्याची शक्यता जयप्रकाश दांडेगावकर यांनी वर्तवली आहे. गतवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस काळ झाल्याने उसाचे लागवड क्षेत्र वाढले आहे त्यामुळे कारखान्यांचा गाळप हंगाम सुद्धा लांबणीवर पडणार असल्याची माहिती आहे कारण सर्व उसाचे कमी कालावधीत गाळप करणे प्रत्येक कारखान्यांना शक्य नाही. अनेकांचे ऊस जळू लागले आहेत, मात्र तरीही ऊस जात नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

प्रत्येक कारखान्याचा गाळप हंगाम हा 160 दिवसापर्यंत असावा, असेही जयप्रकाश दांडेगावकर यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा मोठ्या प्रमाणात भाव घसरण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. यामुळे येणाऱ्या काळात काय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. उसाचा गाळप हंगाम कालावधी वाढवण्यात यावा आणि ऊस बियाणांमध्ये बदल करणे गरजेचे असल्याचे दांडेगावकर यांनी सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान देखील कमी होणार आहे.

English Summary: Sugar prices down, according President Sugar Federation price also come down?
Published on: 22 February 2022, 10:50 IST