News

Parli Vaidyanath Sugar Factory : परळी वैद्यनाथ सहकारी कारखान्यांवर तब्बल २०३ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्ज आहे. या कर्ज फेडीसाठी बँकेने कारखान्याला सातत्याने नोटीस बजावली होती. तरी कारखान्याकडून नोटीसला उत्तर देण्यात आले नाही. यामुळे बँकेने आता कर्ज वसुलीसाठी कारखाना लिलाव करण्याचा निर्णय घेतला.

Updated on 10 January, 2024 10:46 AM IST

Sugar Factory News : परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा लिलाव येत्या २५ जानेवारीला होणार आहे. या कारखान्याच्या अध्यक्षा भाजप नेत्या पंकजा मुंडे आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. कारखान्याकडे युनियन बँकेचे तब्बल २०३ कोटी ६९ लाख रुपयांचे थकीत कर्ज आहे. यामुळे बँकेने वसुलीसाठी कारखान्याचा लिलाव होण्याची नोटीस बजावली आहे. हा कारखाना स्थापना दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी उभारला होता. त्यामुळे आता पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कर्जवसुलीसाठी बँकेकडून नोटीस
परळी वैद्यनाथ सहकारी कारखान्यांवर तब्बल २०३ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्ज आहे. या कर्ज फेडीसाठी बँकेने कारखान्याला सातत्याने नोटीस बजावली होती. तरी कारखान्याकडून नोटीसला उत्तर देण्यात आले नाही. यामुळे बँकेने आता कर्ज वसुलीसाठी कारखाना लिलाव करण्याचा निर्णय घेतला. बँकेने कारखाना संबंधित २३ नागरिकांना नोटीस बजावली होती. यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा देखील सहभाग होता.

याआधीही कारखान्याला नोटीस
परळी वैद्यनाथ साखर कारखान्याला यापूर्वी जीएसटीबाबत नोटीस बजावण्यात आली होती. १९ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस मिळाली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे सांगत त्या संकटाचा सामना केला होता. तर ही रक्कम भरण्यासाठी पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी आणि लोकसहभागातून रक्कम भरण्याची तयारी दाखवली होती. पण त्यासाठी मुंडे यांनी नकार दिला होता. असे चित्र आधीच असतानाच आता वैद्यनाथ कारखान्याचे कर्ज थकीत प्रकरण समोर आले आहे. याबाबत युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर लिलावाची प्रक्रिया हाती घेतली आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कारखान्याचा दिलासा
परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी उभा केला होता. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी कारखाना उभा करण्यात आला. मात्र जीएसटी विभागाची नोटीस त्यानंतर युनियन बँकेची थकीत नोटीस आल्याने पंकजा मुंडे यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. बँकेने २०३ कोटी ६९ लाख कर्ज वसूलीसाठी कारखानाला नोटीस बजावली असून त्याबाबत लिलाव प्रक्रिया करण्याची जाहिरात देखील काढली आहे. यामुळे पंकजा मुंडे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

English Summary: Sugar Factory Parli Vaidyanath Sugar Factory will be auctioned Pankaja Munde troubles increase
Published on: 10 January 2024, 10:46 IST