यंदाचा ऊसाचा गाळप खूपच चर्चेत राहिला आहे. उसाला तोड मिळत नाही, उसाला आग लागणे आणि FRP चा प्रश्न याचर्चेने यंदाचा हंगाम गाजत राहिला आहे. आता एका नवीन विषयाने चर्चेत भर पडली आहे. महाराष्ट्रात सहकाराचे जाळे आहे. राज्यात सहकाराच्या माध्यमातून अनेक साखर कारखाने उभारले गेले. सहकार क्षेत्राला वाळवी लागली आहे. सहकारातून उभारलेले कारखाने विकले गेले.
सहकारी कारखाने आता मात्र यापुढे विकण्याऐवजी भाड्याने चालविण्याकडेच आमचा कल राहील, असा निर्धार महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे व शिखर बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केला आहे. टेक्नॉलॉजिस्ट 'डेक्कन असोसिएशन'ने उद्योगातील साखर तांत्रिक सुधारणा व संशोधनाबाबत आयोजिलेल्या परिसंवादाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
अध्यक्ष विद्याधर अनास्कर अनास्कर म्हणाले, शिखर बँकेचा निम्मा कारभार सहकार संस्थांवर चालतो. कारण ५० टक्के कर्जपुरवठा साखर उद्योगाला होता. त्यामुळे राज्य बैंक अचडणीत आल्यास जिल्हा बँक अडचणीत येतात. यातून पुढे त्या जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था गर्तेत सापडते .त्याकरिता यापुढे सहकारी संस्था टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. संस्थांनादेखील आर्थिक शिस्त आणण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.
आजारी सहकारी कारखाने यापूर्वी विकले गेले. ते खासगी संस्थांनी विकत घेतल्यानंतर मात्र व्यवस्थित चालू लागले. या विरोधाभासाचा अभ्यास करायला हवा . मुळात, आपल्या सहकाराची तत्त्वे जगात सर्वोत्कृष्ट आहेत. मात्र सहकारासाठी बदनामीकारक, मारक ठरणारे मुद्दे टाळायला हवेत. आर्थिक शिस्त आणल्यास सहकारातून समृद्धी येते. त्यामुळे आपल्या संस्था सहकारी तत्त्वामुळे की चालवणाऱ्यांमुळे अडचणीत येतात, हेदेखील शोधले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
Published on: 26 February 2022, 01:44 IST