देशामध्ये साखर उद्योग हा एक मोठा उद्योग असून त्यावर लाखो शेतकरी, कामगार, कष्टकरी व परिसरातील व्यावसायिक यांचे जीवनमान अवलंबून असते. हा साखर उद्योग अधिकाधिक लोकाभिमुख होऊन शेतकरी व तद्नुषंगीक सर्व घटकांचे जीवनमान उंचविण्याचे दृष्टीने सध्या असलेल्या ध्येय धोरणामध्ये काही बदल आवश्यक आहेत का? असल्यास काय असावेत? व त्याकरिता राज्य अथवा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणेकरिता अंतिम प्रस्ताव सादर करता येईल का? त्यादृष्टीने चर्चा करणेसाठी साखर उद्योगातील संबंधित तज्ञ मार्गदर्शकांची ऊस उत्पादक शेतकरी यांची एक प्राथमिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कृषी व सहकार व्यासपीठ, सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे येथे २३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे. साखरेची विक्री किंमत (MSP), साखरेला द्विस्तरीय भाव, ऊसाची किंमती (FRP) बाबत धोरण, दोन कारखान्यामधील अंतर, इथेनॉल निर्मिती व त्याचा एफआरपी वर परिणाम, अतिरिक्त ऊस प्रश्न, सहकारी साखर कारखाने विरुद्ध खाजगी साखर कारखाने- कामकाज व्यवस्थापन तसेच इतर उपपदार्थाच्या मुल्यवर्धन नफा निधीचे वाटप सुत्र या विषयांवर हे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच बैठकीला ऊस उप्तादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याच्या आवाहन साहेबराव खामकर, दत्ताराम रासकर आणि सतिश देशमुख यांनी केले आहे. शेतमालाच्या एकूण 229 प्रकारांपैकी फक्त उस हेच एकमेव पिक आहे, की ज्याला हमीभावाची खात्री आहे. बाकी इतर पिकांसाठी अदानी-अंबानीच्या बिझिनेस पेक्षा जास्त शेतकरी रिस्क व जोखीम घेत असतो. शेतकरी आपल्या न्याय मागण्या मांडून संघर्ष करताना साखर कारखाने म्हणजे शत्रू असल्यासारखे वागत असतो.
त्या मागण्या पुर्ण होणे आवश्यकच आहेत. तसेच कारखान्यातील भ्रष्टाचार संपला पाहीजे. परंतु हे ही लक्षात घेतले पाहीजे की साखर उद्योगामुळे ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावला आहे, रोजगार निर्मिती झाली आहे, शेतकऱ्यांना कारखानदार बनवले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवाना साखर कारखाने हे आपले शत्रू नव्हे मित्र आहेत.
यामुळे साखर उद्योगाशी संबंधित असलेल्या सर्व उत्पादक, सभासद, व्यवस्थापक, उस तोड कामगार, ग्रामस्थ, तज्ञ ह्यांच्यामध्ये वैचारिक सेतु बांधण्याचा हा छोटा प्रयत्न हे चर्चासत्र असल्याचे सतीश देशमुख यांनी सांगितले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादक शेतकरी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
मोदींनी पाठवलेले किसान निधीचे पैसे परत करा, अपात्र असल्यास येईल अंगलट, 'अशी' आहे प्रक्रिया..
स्वराज ट्रॅक्टर्सचा प्रवास आहे खूपच रंजक, शेतकऱ्यांसाठी भविष्यात आहे अनेक योजना, जाणून घ्या..
पांढऱ्या सोन्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारीही मालामाल, कापसाला ऐतिहासिक भाव..
Published on: 22 March 2022, 04:53 IST