नवी दिल्ली: भारतातून चीनला साखरेची निर्यात पुढच्या वर्षीपासून सुरू होईल. यासंदर्भात चीनला 15 हजार टन कच्ची साखर निर्यात करण्याचा करार भारतीय साखर कारखाना संघटना आणि चीनमधल्या सरकारी कंपनीदरम्यान नुकताच करण्यात आला. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने चीनच्या कंपनीसोबत अनेक बैठका केल्यानंतर हा करार प्रत्यक्षात अस्तित्वात आला.
भारत चीनला एकूण 2 मेट्रिक टन कच्च्या साखरेची निर्यात करणार आहे. चीन भारताकडून बिगर बासमती तांदूळ विकत घेतो त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पदार्थ म्हणून साखरेची निर्यात होणार आहे. भारत आणि चीनदरम्यान असलेली 60 अब्ज व्यापारी तूट भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 2017-18 साली भारताची चीनमध्ये होणारी निर्यात 33 अब्ज निर्यात तर आयात 76.2 अब्ज डॉलर्स इतकी होती.
भारत हा जगात साखरेचे उत्पादन करणारा पहिल्या क्रमांकाचा देश असून 2018 साली भारतात 32 दशलक्ष मेट्रीक टनाचे उत्पादन झाले. भारतात कच्ची शुद्ध आणि पांढरी अशा सर्व प्रकारची साखर निर्माण होते. अत्यंत उच्च दर्जाची साखर भारतात निर्माण होत असून चीनला नियमितपणे चांगल्या दर्जाची साखर निर्यात करण्यासाठी भारतीय साखर उद्योग सक्षम आहेत.
Published on: 09 November 2018, 06:43 IST