कोल्हापूर : यंदाच्या हंगामात साखरनिर्यात गतीने होत असतानाच निर्यातीला अफगाणिस्तान व श्रीलंकेतून ब्रेक लागला आहे. या देशांना महिन्याला ६० ते ७० हजार टन साखर भारतातून निर्यात होत असते. पण त्यांच्या अंतर्गत घडामोडींचा फटका साखरनिर्यातीला बसला आहे. यामुळे येथे होणारी निर्यात थांबली आहे.
सध्या अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबान संघटनांनी सुरू केलेल्या घुसखोरीमुळे भारतीय साखर निर्यातदार अफगाणिस्तानला साखरनिर्यात करण्यास तयार नाहीत. अफगाणिस्तानमध्ये साखर पाठवल्यास साखरेचा परतावा मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते, तसेच तेथील बॅंकिंग व्यवस्था ही विस्कळीत झालेली आहे, या भीतीमुळे भारतीय निर्यातदार अफगाणिस्तानला साखर निर्यात करण्यासाठी नाखूष आहेत.
श्रीलंकेनेही साखर आयातीवर निर्बंध लावले आहेत. यामुळे २२ मेपासून श्रीलंकेला निर्यात होणारी साखर आता होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. श्रीलंकेमध्ये पूर्वीचा साखर साठा जादा शिल्लक असल्यामुळे, तसेच श्रीलंकेमध्ये परकीय चलन डॉलरची कमतरता असल्यामुळे श्रीलंका सरकारने साखर आयात न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा भारतीय साखर कारखानदारीला मोठा फटका बसत आहे. याच्या परिणामस्वरूप ‘ओ.जी.एल.’अंतर्गत होणारी साखरनिर्यात अपेक्षेपेक्षा कमी होऊ शकते.
यंदा इंडोनेशियाबरोबरच या दोन देशांनीही साखरनिर्यातीला मोठा आधार दिला आहे. इंडोनेशिया खालोखाल अफगाणिस्तानमध्ये १२.५ टक्के, तर श्रीलंकेत ८ टक्के इतकी निर्यात झाली आहे. सध्या इंडोनेशियानेही गरजेइतकी साखर खरेदी करून ठेवली आहे. परंतु या देशाव्यतिरिक्त इतर आघाडीच्या देशांकडे निर्यात कमी झाल्याने यंदा शेवटच्या टप्प्यातील निर्यातीला फटका बसेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
सध्या २०१८-१९ व २०१९-२० या हंगामातील जुन्या साखरेला थोड्याफार प्रमाणात मागणी आहे, परंतु दरात विशेष वाढ नाही. सध्या २०१८-१९ व २०१९-२० या हंगामातील जुन्या साखरेला २७५० ते २८०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. देशात १५ जूनपर्यंत ५८ लाख टन साखरेचे करार झाले आहेत. यापैकी ४५ लाख टनांहून अधिक साखर प्रत्यक्षात निर्यात झाली आहे.
Published on: 03 July 2021, 12:05 IST