राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लवकरच शंभर दिवस पूर्ण होत आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शंभर दिवसाविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, कर्जमाफी हा शंभर दिवसातील महत्त्वाचा निर्णय आहे. इतक्या कमी दिवसात आपण कर्जमुक्ती केल्याने समाधानी आहोत. तसेच शेतकऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि राखलेल्या संयमाबद्दल त्यांनी आभार मानलेत. मुंबईत आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर कर्जमुक्तीचा निर्णय घेण्यात आला. लोकांनी सरकारवर विश्वास ठेवला आणि संयम बाळगला. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभतेने पूर्ण होत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत. डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या अधिवेशनात २ लाखांपर्यंतची कर्जमुक्ती करण्याचे आश्वसन देण्यात आले होते. दरम्यान सरकारकडून दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आतापर्यंत पोर्टलवर ३५ लाख ८०९ कर्जखाती अपलोड केली आहेत. तर २१ लाख ८१ हजार ४५१ जाहीर झालेली कर्जखाती आहेत. शेतकऱ्यांकडून १० लाख ३ हजार ५७३ आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. आत्तापर्यंत ७ लाख ६ हजार ५०० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ४ हजार ८०७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येचा दौरा करणार आहेत. तर एनआरपी आणि एनआरसीसाठी तिन्ही पक्षासह मित्रपक्षांच्या सदस्यांची एक समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
Published on: 03 March 2020, 05:15 IST