News

सोलापूर: आपल्या देशात शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. यामुळे पाण्याचे प्रभावी नियोजन करणे आता अपरिहार्य बनत चालले आहे. आपल्याकडची कमी होत चाललेली पाण्याची पातळी, उत्पादनवाढीसाठी पाण्याचे प्रभावी नियोजन, पाण्याचा अनिर्बंध वापर केल्यामुळे ढासळत चाललेला जमिनीचा पोत या सर्वांचा विचार करता आता ठिबक सिंचन प्रणाली शेती क्षेत्रात एक महत्त्वाचा घटक बनत चालले आहे.

Updated on 24 March, 2022 8:39 AM IST

सोलापूर: आपल्या देशात शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. यामुळे पाण्याचे प्रभावी नियोजन करणे आता अपरिहार्य बनत चालले आहे. आपल्याकडची कमी होत चाललेली पाण्याची पातळी, उत्पादनवाढीसाठी पाण्याचे प्रभावी नियोजन, पाण्याचा अनिर्बंध वापर केल्यामुळे ढासळत चाललेला जमिनीचा पोत या सर्वांचा विचार करता आता ठिबक सिंचन प्रणाली शेती क्षेत्रात एक महत्त्वाचा घटक बनत चालले आहे.

शासन दरबारी देखील ठिबक सिंचन प्रणालीचा वापर वाढावा तसेच यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या अनुषंगाने अनेक योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांना ठिबक संच उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी केंद्र सरकार कडून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मार्फत अनुदान दिले जाते तसेच राज्य सरकारच्या मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना द्वारे जवळपास जिल्ह्यातील पंधरा हजार शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदानावर ठिबक सिंचन संच उपलब्ध करून दिला जातो.

पाण्याचा अपव्यय वापर केल्यामुळे दिवसेंदिवस आपल्याकडील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. याचा विचार करता आता शेतकरी बांधवांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. याच गोष्टीचा विचार करता शासनाने ठिबक सिंचन प्रणाली साठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनेअंतर्गत शासन वारंवार शेतकरी बांधवांना ठिबक संच खरेदी करण्यासाठी अनुदान देऊ करत असते.

ज्या शेतकरी बांधवांना ठिबक सिंचन प्रणालीचे अनुदान प्राप्त करायचे असेल त्यांना महाडीबीटी या शासनाच्या पोर्टल वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज जमा करावा लागतो. संबंधित शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन प्रणाली बसवली आहे की नाही याची खातरजमा केल्यानंतर या योजनेचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाते. या योजनेअंतर्गत करमाळा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना अवघ्या बोटावर मोजण्याइतक्या दिवसातच अनुदान दिले गेले आहे.

करमाळ्यातील असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना अवघ्या 13 दिवसात या योजनेचे अनुदान प्राप्त झाले आहे. शासनाच्या या योजनेअंतर्गत आता साडे बारा एकर क्षेत्र अर्थात पाच हेक्‍टर क्षेत्र पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकरी बांधवांना जवळपास 80 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला मात्र केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना द्वारे ठिबक सिंचन संच खरेदी करण्यासाठी 45 टक्के अनुदान दिले जाते, याद्वारे लहान शेतकऱ्याला 55 टक्के अनुदान मिळत असते.

राज्य सरकारचे मुख्यमंत्री शाश्वत योजनेअंतर्गत मोठ्या शेतकऱ्यांना 35% आणि लहान शेतकऱ्याला 35% अनुदान पुरवले जाते. 2021-22 या वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून सुमारे 18 हजार शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन अनुदानासाठी अर्ज केला होता यापैकी सुमारे आठ हजार 500 शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. या शेतकऱ्यांना एकूण 22 कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. या चालू वर्षासाठी आता सुमारे 70 कोटींचे अनुदान लागणार असल्याचे अधीक्षक यांनी नमूद केले आहे.

English Summary: subsidy for drip irrigation now send in 13 days
Published on: 23 March 2022, 11:54 IST