News

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये या दृष्टीने अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

Updated on 19 October, 2023 3:56 PM IST

मुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांची प्राथमिक दूध संकलन केंद्रावर फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा सहकारी दूध संस्था, वैधमापन शास्त्र अधिकारी आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्षात वजन मापासंदर्भात पाहणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये या दृष्टीने अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

मंत्री भुजबळ म्हणाले की, फॅट व एस.एन.एफ. तपासणीच्या मशीनवर तफावत आढळत असल्याने प्राथमिकस्तरावर दूध संकलन केंद्रामध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे व अन्य साधने वापरून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

त्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांवर दुधाचे घनफळ व वजन दोन्ही मोजमाप होऊन त्यांची नोंद शेतकऱ्याला दिल्या जाणाऱ्या पावतीवर होण्यासंदर्भातही तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री श्री. भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी सचिव सुमंत भांगे, वैध मापन शास्त्रचे सह नियंत्रक विलास पवार, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, रूपेश पाटील यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.

English Summary: Submit Inspection Report of Milk Collection Centre
Published on: 19 October 2023, 03:56 IST