बारामती : शेतातील पिकांसाठी रासायनिक खते व किटकनाशकांच्या अतिवापराने शेतीचे संपूर्ण तंत्र बिघडत चालले आहे. रासायनिक खते व किटकनाशकांच्या अधिक किंमतीने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. याउलट सेंद्रिय पध्दतीने कमीत कमी खर्चात पिकांवरील रोगांचे नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येते.
बारामती कृषी महाविद्यालयातील कृषी कन्या साक्षी सतिश बोबडे या चतुर्थ वर्षामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत सांगवी ( ता. बारामती ) येथील शेतकरी बांधवांना निंबोळी अर्क म्हणजे काय, त्याचे कार्य, निंबोळी अर्काचे महत्व, निंबोळी अर्क बनविण्याची पध्दत, निंबोळी अर्काचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले आहे. रासायनिक किटकनाशकाच्या अतिरेक वापरामुळे शेतीचे होणारे अतोनात नुकसान टाळण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर करून फवारणी करण्याचा कृषी सल्ला सांगवी येथील शेतकरी बांधवांना यावेळी देण्यात आला. कृषी कन्या साक्षी बोबडे हीने कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप गायकवाड, प्राचार्य शरद दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतकऱ्यांना निंबोळी अर्काबद्दल मार्गदर्शन केले.
निंबोळी अर्क बनविण्याची पध्दती अत्यंत साधी व सोपी असून शेतकरी बांधव आपल्या घरी कमीत - कमी वेळेमध्ये निंबोळी अर्काची निर्मिती करू शकतात. प्रथम निंबोळ्यांची साल काढून घ्यावी. निंबोळ्या ऊन्हामध्ये वाळत घालाव्यात. निंबोळी अर्क तयार करण्यासाठी निंबोळीची दळून बारीक पूड करावी २ किलो निंबोळीची पूड एका कापडामध्ये गुंडाळून ती १५ लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी. निंबोळीची पूड पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवल्याने निंबोळीचा अर्क पाण्यामध्ये उतरून एकरूप होतो. हा अर्क भाजीपाला, पिकांवर फवारल्यास किडीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते,अशी माहिती साक्षी बोबडे हिने दिली.
निंबोळी अर्क इकोफ्रेंडली असून निंबोळी अर्क बनविण्यासाठी जास्त खर्च येत नाही. कडूनिंबाच्या झाडामध्ये असलेले अॅझाडिराक्टिन किडनाशकाचे काम करते. अमेरिकन बोंड अळ्या, तुडतुडेपाने पोखरणाऱ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, कोबीवरील अळ्या, फळमाश्या, लिंबावरील फुलपाखरे, खोड किडा आदी किडीवर याचा चांगला प्रभाव पडतो, व किडीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते.
Published on: 22 September 2020, 06:12 IST