मुंबई: ‘सर्वांसाठी आरोग्य’ ह्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्मान भारत’ योजना महत्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील लाखो बांधवांसाठी विकासाची पहाट ठरेल. महाराष्ट्रात या योजनेसोबतच महात्मा फुले जनआरोग्य योजनाही एकत्रित राबविली जाणार असल्याने राज्यातील 90 टक्के लोकसंख्येला आरोग्य विम्याचे कवच मिळणार असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे सांगितले.
झारखंड रांची येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा राष्ट्रव्यापी शुभारंभ करीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, मुंबई शहराचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगराचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
राज्यपाल म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळात आरोग्य क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण संशोधन झाले. आयुर्मानात वाढ होऊन ते 32 वरून 70 पर्यत आले. माता आणि अर्भक मृत्यूदरातही कमालीची घट झाली आहे. त्याच्याच पुढे जाऊन ‘आयुष्मान भारत’ योजनाही सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेच्या पूर्तीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजचा दिवस देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे. जगातील सर्वात मोठ्या अशा शासकीय आरोग्य सुरक्षा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून झाला आहे. वातावरणातील बदलामुळे रोगराईचा विविध प्रकारे प्रादुर्भाव जाणवत आहे. उपचार घेण्यासाठी सामान्यांना आयुष्याची कमाई लावावी लागते, मात्र देशात प्रथमच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबाला उपचार मिळाला पाहिजे असा विचार करून ‘आयुष्मान भारत’ योजना सुरू केली. या योजनेमुळे आरोग्य क्षेत्रांत क्रांती होत आहे.
योजनेची वैशिष्ट्ये:
- ही योजना पूर्णपणे नि:शुल्क आहे. सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश (गुडघा, खुबा, कोपर, प्रत्यारोपण), लहान मुलांच्या कर्करोगाचा उपचारांचा समावेश, मानसिक आजरावरील उपचारांचा समावेश.
- प्रती कुटुंब प्रति वर्ष 5 लाखाच्या रकमेचे मोफत उपचार, इतर राज्यातील लाभार्थी कुटुंबे योजनेचा लाभ घेऊ शकतात, कुटुंबाचा समावेश लाभार्थ्यांच्या यादीत होत असल्यास संगणक प्रणालीद्वारे कुटुंब सदस्यास ई-कार्ड मिळण्याची तरतूद.
- केंद्रचा 60 टक्के हिस्सा तर राज्याचा 40 टक्के हिस्सा, 1000 पेक्षा जास्त उपचारांचा लाभ.
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांची एकत्रितपणे अंमलबजावणी.
- योजना पूर्णपणे संगणीकृत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरवातीला 79 शासकीय रूग्णालयात लाभार्थ्यांना उपचार देणार.
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या 489 अंगीकृत रूग्णालयामार्फत पूर्वीप्रमाणे 971 उपचारांची सेवा मिळणार, अंगीकृत रूग्णालयात आयुष्मान मित्रांची नेमणूक.
कोण असणार आहेत पात्र:
आयुष्मान भारत योजनेत पात्र लाभार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीचे दारिद्र रेषेखालील कुटुंब, भूमिहीन कुटुंब, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एकाखोलीचे कच्चे घर असलेले कुटुंब, महिला कुटुंब प्रमुख असलेले, यांचा या योजनेत सहभाग आहे.
तर शहरी भागातील कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लंबर, गवंडी, वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, झाडू मारणारे/सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकल रिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, अटेंडट, हॉटेल वेटर, मेकॅनिक/वीजतंत्री, असेम्ब्ली, दुरुस्ती करणारे, धोबी आणि चौकीदार या वर्गीकरणातील कुटुंब या योजनेत पात्र आहेत.
Published on: 23 September 2018, 09:42 IST