मुंबई: राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यांचे दौरे सुरू केले असून त्यांनी नाशिक आणि ठाणे येथे बैठक घेऊन खरिपाचा आढावा घेतला. दरम्यान, आज दि. २१ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी १२ वाजता ही बैठक होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरू झाले. याकाळात कृषिमंत्री श्री. भुसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कृषि सचिव, आयुक्त तसेच क्षेत्रिय कृषि अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधत आहेत.
मार्च-एप्रिल महिन्यापासून खरिपाच्या तयारीचा ते आढावा घेत असताना ३० एप्रिलपूर्वी पर्यंत प्रत्येक जिल्ह्याच्या खरिपाच्या नियोजनाला पालकमंत्र्यांकडून मान्यता घेण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले होते. गेल्या आठवड्यात कृषीमंत्री श्री. भुसे, विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खरीपाच्या तयारीचा आढावा घेतला होता. आज होणाऱ्या राज्यस्तरीय खरीपाच्या आढावा बैठकीत राज्याच्या नियोजनाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मान्यता देतील.
कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे देण्याचे नियोजन कृषि विभागाने केले असून त्याचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री श्री. भुसे यांनी आजपासून जिल्ह्यांच्या दौऱ्याला सुरूवात केली आहे. नाशिक येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी २०२० हे वर्ष कृषी उत्पादकता वर्ष म्हणून साजरा करण्याचा संकल्प केल्याचे सांगितले. कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत थेट बांधावर बियाणे पोहोचविण्यासाठी कृषी विभाग सज्ज असल्याचे सांगितले. त्यानंतर कृषी मंत्र्यांनी ठाणे जिल्ह्याच्या खरीपाचा आढावा घेतला.
Published on: 21 May 2020, 08:26 IST