News

नोंदविलेल्या सर्व बेवारस गुन्ह्यातील आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत व आय.पी.सी. कलम ३२८ अन्वये तसेच एम.पी.डी.ए. कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी दिल्या.

Updated on 24 June, 2024 9:57 AM IST

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हातभट्टी दारुचे समूळ उच्चाटन करण्यासाठी २२ जून रोजी राबविलेल्या धाडसत्र मोहिमेमध्ये स्वतः सहभागी होत ठाणे जिल्ह्यातील मौजे अलिमघर, दिवा, घेसर, खरडर्डी, छोटी देसाई, मोठी देसाई, मानेरे गांव, कालवार, भिवंडी, कोरावळे, शहापुर, कुंभारली व रायगड जिल्ह्यातील काही गांवामधील हातभट्टी दारू निर्मीती केंद्रांवर धाडी टाकून उध्वस्त केली.

या कारवाईमध्ये ठाणे जिल्ह्यात १ वारस व २३ बेवारस असे एकुण २४ गुन्हे नोंदविले आहेत. यामध्ये ५९५ लिटर हातभट्टी दारु, ६९ हजार २०० लिटर रसायन व इतर भट्टी साहित्य असा एकूण २६ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. मोहिमेमध्ये उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी कोकण विभागाचे उप आयुक्त व ठाणे जिल्ह्याचे अधिक्षक यांच्या समवेत स्वतः तीन बोटी मधून मौजे अलिमघर, दिवा, अंजुर खाडीतील हातभट्टी दारू निर्मीती ठिकाणे उध्वस्त केली. तसेच रायगड जिल्ह्यातील पथकाने एकूण ८ गुन्हे नोंदवून एकूण ४ लाख ६७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. या कारवाईत १३० अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

नोंदविलेल्या सर्व बेवारस गुन्ह्यातील आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत व आय.पी.सी. कलम ३२८ अन्वये तसेच एम.पी.डी.ए. कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी दिल्या.

या कारवाईमध्ये विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे, उपअधीक्षक वैभव वैद्य, डोंबिवली, मुंबई उपनगर, मुंबई शहर, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर विभागाचे निरीक्षक, कर्मचारी तसेच त्यांच्या भरारी पथकांचा समावेश होता.

English Summary: State Excise Department raids Hatbhatti liquor manufacturing centers in Thane, Raigad district
Published on: 24 June 2024, 09:57 IST